जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाली असून आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १०४ विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे़ त्याचबरोबर २ हजार १५१ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश मिळाला असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर आरटीईतंर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो़ यंदा जळगाव जिल्ह्यातील २८७ शाळांमधील ३ हजार ५९४ जागांसाठी प्रवेश प्रक्रि या राबविण्यात आली़ या जागांसाठी जिल्हाभरातून ८ हजार ४६३ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाला अर्ज झाले होते़ त्यापैकी ३ हजार ३४१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी १ हजार १०४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे तर २ हजार १५१ विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.कागदपत्रांची पडताळणीपाल्याच्या प्रवेश निश्चितीसाठी पालक शाळेत जावून कागदपत्रांची पडताळणी करून घेवून प्रवेश निश्चित करून घेत आहेत़ दरम्यान, शाळास्तरावर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुन्हा गटशिक्षणाधिकारी यांच्या समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी होत आहे़ वावडदा येथे काही पालकांनी भाडेकरू दाखवून लॉटरीमध्ये क्रमांक मिळविल्याचा प्रकार इतर पालकांच्या तक्रारीतून समोर आला होता़ त्यामुळे कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.यावल तालुक्यात प्रवेश निश्चिती ‘झिरो’यावल तालुक्यातील १६२ विद्यार्थ्यांना आरटीई लॉटरीमध्ये क्रमांक लागला आहे़ या विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज पाठविण्यात आले असून १६२ पैकी ९० विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवेश देण्यात आला आहे़ मात्र, अद्याप एकाही विद्यार्थ्याने शाळेमध्ये प्रवेश निश्चित केला नाही.
जिल्ह्यातील १ हजार १०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:43 PM