जळगाव : दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या प्रक्रियेचे नोटिफिकेशन येत्या एक ते दोन दिवसात जाहीर केले जाणार असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत देण्यात आली. विशेष म्हणजे, दहावीच्या निकालात वेळ असल्याने विद्यार्थ्यांना अर्जात केवळ बैठक क्रमांक द्यावा लागणार आहे.
राज्यात ३७६ पॉलिटेक्निक संस्था आहेत. त्यात एकूण १ लाख ४ हजार ३८५ एवढी प्रवेश क्षमता आहे. या वर्षी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या नियमावली मध्ये काहीसे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी दहावीची गुणपत्रिका नसली तरीही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना दहावी परीक्षेचा केवळ बैठक क्रमांक अर्जात नमूद करावा लागणार आहे. मंडळाकडून निकालानंतर त्याचे गुण अॅड केले जाणार आहेत. तसेच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावी नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे नोटिफिकेशन एक ते दोन दिवसात जाहीर होईल, असे तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवर रविवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत यंदाही केंद्रीय पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे दहावीनंतर डिप्लोमा अभियांत्रिकीला प्रवेश मिळतो. तसेच बारावी विज्ञान, आयटीआय उत्तीर्ण व किमान कौशल्य टेक्निकल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीला प्रवेश मिळतो. त्याचबरोबर बारावी विज्ञान नंतर फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. तसेच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात राबविण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तेवढे बदल करून प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
प्राचार्यांची बैठक
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ़ अभय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सह संचालक डी.पी.नाठे, यांनी नुकतीच नाशिक विभागातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी संस्थेचे प्राचार्य व प्रवेश प्रक्रिया संबंधित अधिकारी यांची गुगल मिटद्वारे बैठक घेऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सर्व शासकीय व अनुदानित संस्था जेथे कोविड केअर सेंटर्स सुरू आहेत. तेथे ई-सुविधा केंद्र कार्यान्वित करण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. काही खासगी संस्थांमध्येसुद्धा ई-सुविधा केंद्र व आवश्यकता असल्यास स्लॉट बुक करून प्रत्यक्ष सुविधा केंद्रात जाण्याचे प्रयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
पालक व विद्यार्थ्यांना जास्त घराबाहेर न पडता मोबाइल किंवा संगणकाद्वारे अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड कशा पद्धतीने करता येईल़ या बाबतीत नियोजन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जळगाव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.एस.बी.वेस्ली यांनी केले आहे.