जळगाव : तंत्रशिक्षण संचालनालयाने बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेला शनिवार, १० जुलैपासून सुरुवात झाली. दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाची वाट न पाहता, बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी दोन पर्याय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुचविण्यात आले आहेत. यात विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून ई-स्क्रूटनी पध्दतीचा पर्याय निवडू शकतील. या पध्दतीमध्ये उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून संगणक/स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन अर्ज भरू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्रांवर (एफसीद्वारे) पडताळले जाणार आहेत. तसेच दुसऱ्या पर्यायात मोबाइल व संगणकावरून ऑनलाइन नोंदणी करून प्रत्यक्ष स्क्रूटनी पध्दतीचा पर्याय विद्यार्थी निवडू शकतील. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन अथवा संगणकाची सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळील सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी व सोयीस्कर वेळ ठरवण्यासाठी जावे. अशाप्रकारे ऑनलाइन नोंदणी झालेले विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची तारीख व वेळ ठरवून घेतील. विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, स्कॅन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आदी प्रक्रिया सुविधा केंद्रावर स्वत: नि:शुल्कपणे करून शकतील.
असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
१० जुलै ते २ ऑगस्ट - ऑनलाइन नोंदणी करायची आहे. सोबत आवश्यक कागदपत्रांच्या कॉपी अपलोड करावयाच्या आहेत. याचदरम्यान कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती होईल.
५ ऑगस्ट - तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.
६ ते ८ ऑगस्ट - तात्पुरत्या गुणवत्ता यादीबद्दल हरकती व दुरुस्ती
१० ऑगस्ट - अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.
सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
प्रत्यक्ष स्क्रूटनी पध्दत निवडणारे विद्यार्थी शासनाकडून वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. नियुक्त केलेल्या सुविधा केंद्रांवर सामजिक अंतर राखणे तसेच त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार व पालकांची गर्दी टाळणे अंत्यत आवश्यक आहे. तसेच कॅपच्या विविध फेऱ्यांकरिता विकल्प अर्ज भरणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थांमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख आदींबाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाणार आहे.