जळगाव : आठ दिवसापूर्वी पोलिसांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे शेजारच्याने माझे काहीच झाले नाही, असे सांगत पुन्हा मारहाण केल्याने नैराश्यात आलेल्या संभाजी सुखदेव साळुंखे (४२) या प्रौढाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना धार, ता.धरणगाव येथे घडली. दरम्यान, संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पाळधी दूरक्षेत्रात नेला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाला आहे, असा आरोप करुन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी लगेच पाच जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. त्यानंतर सायंकाळी मृत संभाजी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास मंगा साळवे, सरलाबाई कैलास साळवे, शितल कैलास साळवे, पूजा कैलास साळवे व पूनम कैलास साळवे (सर्व रा.धार, ता.धरणगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून कैलास साळवे याला अटक करण्यात आली आहे.याबाबत मृत संभाजी साळुंखे यांची पत्नी उषाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जुलै रोजी शेजारी राहणारे सरला कैलास साळवे व त्यांच्या मुली शितल, पूजा व पूनम यांनी घराच्या पत्र्यावर माती पडल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत पाळधी पोलिसात तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन वैद्यकिय मेमो देऊन उपचारासाठी पाठविले. त्यानंतर देखील या कुटुंबाने सतत शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. याचीही माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.१ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पती संभाजी, मुलगा ज्ञानेश्वर व जयेश असे घरी असताना कैलास मंगा साळवे याने घरी येऊन शिवीगाळ केली व टोचून बोलला की, तु तक्रार केली, माझे काय झाले. तुझ्याकडून माझे काहीच होणार नाही. मी पोलिसांना पैसे दिले आहेत, असे म्हणत परत पती व मुलांना मारहाण केली. एकीकडे पोलिसांनी तक्रारीनंतरही कारवाई केली नाही दुसरीकडे शेजारच्याच त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यामुळे मनस्ताप करुन संभाजी याने रात्री नऊ वाजता घराच्या वरच्या मजल्यावर जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली. रात्री १० वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.पोलिसांच्या दुर्लक्षामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यांनी समोरासमोर दोघं गटाला बोलावून समजूत घातली असती तर ही घटना घडली नसती. पोलिसांनी यात पैसे घेतले आहेत.-उषाबाई साळुंखे, मृताची पत्नीया प्रकरणात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय १४९ ची नोटीस देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अदखलपात्र गुन्ह्याच पोलिसांना तपासाच्या मर्यादा असतात.-हनुमंत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक, पाळधी
पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने प्रौढाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:04 AM