जळगाव : जळगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील सहायक सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याचा निकाल हा दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने अभ्यासक्रम व संशोधनासाठी घेतला असून या गुन्ह्याचा तपास व निकाल यावर एलएलएमच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी त्यावर संशोधन करणार आहेत. याआधीदेखील बोरखेडा येथील चार भावंडांच्या खून खटल्याच्या तपासाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली होती. दरम्यान, यामुळे दुसऱ्यांदा पोलीस दलात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सहायक सरकारी वकील विद्या ऊर्फ राखी भरत पाटील यांचा १३ जानेवारी २०१९ रोजी खून झाला होता. यात पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. १३ मे रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी पती डॉ. भरत पाटील याला जन्मठेप तर सासरे पोलीस पाटील याला चार वर्षाची शिक्षा सुनावली. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने खून केल्याचे निष्पन्न झाले होते. उशीने व हाताने तोंड दाबून ठार मारले असता पतीने डॉक्टरांकडे कधी इलेक्ट्रिक शॉक तर कधी हृदयविकाराचा झटका अशी वेगवेगळी कारणे सांगितली होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शवविच्छेदन न करता परस्पर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती. या खून खटल्यात प्रत्यक्षदर्शी एकही पुरावा नव्हता. तांत्रिक व शास्त्रीय पुरावा यासोबत जिद्द व चिकाटीने केलेला तपास महत्त्वाचा ठरला आहे.
बोरखेडानंतर जामनेरची दखल
याआधी बोरखेडा, ता. रावेर येथे चार भावंडांच्या हत्येच्या तपासाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली होती. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कोरोनामुळे जळगाव येथूनच राष्ट्रीय कार्यशाळेत ऑनलाईन सादरीकरण केले होते. आता विद्या राजपूत यांच्या खुनाचा तपास व निकाल या दोन्ही बाबींची राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने दखल घेतली आहे.