चाळीसगावला उन्नत ग्रामविकास अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 4:57 PM
तीन दिवस कार्यशाळा : आमदारांसह अधिकारी वर्गाने केले मार्गदर्शन
<p>चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील सर्व गावांतील समस्यांचा आढावा घेऊन सरपंच व सादस्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय उन्नत ग्रामविकास अभियान कार्यशाळा पार पडली. यानिमित्ताने लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यात उहापोह झाला. गावांचे विकासात्मक कृती आराखडे तयार करण्यात आले.दर दिवशी १२ तासांहून अधिक काळ ही कार्यशाळा चालली.या वेळी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याशी गावात आवश्यक विविध विकासकामांबाबत आमदार उन्मेष पाटील, पंचायत समिती सभापती, उपसभापती, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी चर्चात्मक संवाद साधला. अभियानात पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, वीज वितरणचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, गटशिक्षणाधिकारी, महिला बालविकास अधिकारी आदी ग्रामविकासाशी संबंधित सर्व विभाग सहभागी झाले होते.गावनिहाय समस्या व प्रश्नांच्या नोंदी घेण्यात आल्या. या वेळी आमदार उन्मेष पाटील यांनी गावगाड्याच्या कारभारात राजकारण न आणता विकासासाठी पुढे यावे. सर्वतोपरी मदत करू, असे आवाहन केले.अभियान कार्यशाळेमुळे तीन दिवस शासकीय विश्रामगृहाला यात्रेचे स्वरुप आले होते. सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी असे अभियान राबविल्याबाबत समाधान व्यक्त केले.काय आहे अभियान?ग्रामविकासासंदर्भात गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अनेक अडचणी येत असतात, अनेक विकासकामांसाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध असतानादेखील योग्य मार्गदर्शन व पाठपुरावा न केल्यामुळे गावांना या कामांपासून वंचित राहावे लागते. प्रशासकीय स्तरावरदेखील काही अडचणी निर्माण झाल्यामुळे विकासकामांना खोळंबा येतो. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासनाचा समन्वय व्हावा, येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात. यासाठी अभियान ही संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सात गटनिहाय ही अभियान कार्यशाळा पार पडली.1. २४ रोजी करगाव- टाकळी प्रचा व दुपारी रांजणगाव- पाटणा, २५ रोजी बहाळ-कळमडू व दुपारी पातोंडा- वाघळी, २६ मेहुणाारे-दहिवद व उंबरखेड सायगाव, २७ रोजी देवळी- तळेगाव या जिल्हा परिषद गटातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले.