लोकमत मुलाखत-जळगाव : साहसी खेळांचा समावेश हा शिक्षण पद्धतीत झाल्यास त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकासात वाढ होईल. गिर्यारोहण तसेच अन्य साहसी खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतंत्र गुण द्यावेत, यामुळे साहसी खेळांचा विकास होईल, असे मत प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.जळगावच्या आशा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी उमेश झिरपे हे जळगावला आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी लोकमतशी विशेष चर्चा केली.झिरपे म्हणाले की,‘ जगभरात १४ आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे सर करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील सात शिखरे आम्ही सर देखील केली आहे. महाराष्ट्रातील सध्याची गिर्यारोहणाची स्थिती यावर बोलताना झिरपे म्हणाले की, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये गिर्यारोहण आणि अॅडव्हेंचर टुरिझम सध्या वाढले आहे. या खेळांमध्ये सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. या क्षेत्रात देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रशिक्षीत व्यक्तींची गरज आहे. शासकीय पातळीवर देखील प्रयत्न सुरू आहेत.’ते पुढे म्हणाले की, गिर्यारोहण आणि अन्य साहसी खेळांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शाळेत जसे संगीत, चित्रकला, इतर खेळांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुण दिले जातात, त्याप्रमाणेच गिर्यारोहण, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग या साहसी खेळांना देखील स्वतंत्र गुण दिले जावे. त्याने या खेळांना प्रोत्साहन मिळेल. तसेच लहान वयात मुले सध्या मोबाईल आणि इंटरनेटकडे आकर्षित होत आहेत. त्यांच्यातील उर्जेचा योग्य वापर देखील होईल. लहान मुलांसाठी विविध साहसी खेळांच्या प्रशिक्षणाचे आयोजन ‘गिरीप्रेमी’ या संस्थेमार्फत केले जाते.’एव्हरेस्ट वीर उमेश झिरपे यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये या खेळांमुळे नेतृत्वगुण, संघ भावना वाढीस लागते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांना लाईफ स्किल्सचे शिक्षणच यातून मिळते.’
कांचनजुंगा चढाईसाठी कठीण शिखरमाऊंट कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असले तरी हे शिखर मला चढाईसाठी कठीण वाटते. हा पर्वत चढताना दगड आणि बर्फातून मार्ग काढावा लागतो. तर ६० ते ७० अंशाच्या कोनात बेस कॅम्पपासून ११०० मीटर चढाई करावी लागते.त्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. प्रत्येक शिखर हे आव्हानात्मक असले तरी त्याचा वेगळेपणा असतो, असेही ते म्हणाले