जळगाव : शहरातील राजीव गांधीनगरात महावितरणने वीजचोरांचे आकोडे जप्त केल्यानंतर, या ठिकाणी वीजचोरीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी एरियल बंच केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे या नागरिकांना विजेची चोरी करता येणे शक्य नसून, नागरिकांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.
महावितरण प्रशासनाने सोमवारी हरिविठ्ठलनगर परिसरातील राजीव गांधीनगरात वीजचोरांवर जोरदार कारवाई मोहीम राबवून दीडशे जणांचे आकोडे जप्त केले. या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणचे अधिकृत वीज कनेक्शन न घेता, विद्युततारांवर आकोडे टाकून विजेची चोरी करत होते. यामुळे महावितरण प्रशासनाने या भागात वीजचोरीला आळा घालण्यासाठी एरियल बंच केबल टाकण्यास सुरुवात केली आहे. या भागातील नागरिकांनी आकोडे टाकून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यामुळे अनेक वेळा या परिसरात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे महावितरणने या प्रकाराला आळा घालण्यासाठी एरियल बंच टाकण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिकांना विजेची चोरी करता येणे शक्य नसून, नागरिकांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याशिवाय पर्याय नाही. सुरुवातीपासूनच या नागरिकांनी अधिकृत विजेची जोडणी न केल्यामुळे, महावितरणतर्फे या नागरिकांना दंडात्मक कारवाई न करता, त्यांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचे आवाहन केले आहे.