अमळनेर, दि.7 - खान्देशचे वैभव असलेला संत सखाराम महाराजांचा रथ रविवारी सकाळी 8.10 वाजेच्या सुमारास वाडी संस्थानात पोहचला. रथ जागेवर पोहचण्यास 12 तासाचा कालावधी लागला.
संत सखाराम महाराज वाडी संस्थानतर्फे दरवर्षी वैशाख शुद्ध एकादशीला रथ काढण्याची परंपरा आहे. शनिवारी रात्री 7.54 वाजता रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती स्थापन करण्यात आली. रात्री 8 वाजून 8 मिनीटांनी रथ वाडी संस्थानातून मार्गस्थ झाला. सतगुरू सखाराम महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता. रथ मार्गावर अनेक ठिकाणी पान सुपा:यांचा कार्यक्रम झाला. रात्री 1.50 वाजता रथ दरवाजाच्या बाहेर पडला. त्यानंतर पहाटे 2.50 वाजेच्या सुमारास फरशीपुलावर नयनरम्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. रथ पैलाड ते कसाली मोहल्ला दरम्यान बांधलेल्या पुलावर सकाळी 7 वाजता आला. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे हजर होते. रविवारी सकाळी 8.10 वाजता वाडी संस्थानात पोहचला. तेथेही फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी प्रसाद महाराजांच्या हस्ते सेवेक:यांना श्रीफळ देवून गौरविण्यात आले, अशी माहिती उदय देशपांडे यांनी दिली.