जळगाव : गेल्या १३ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री पुन्हा दमदार आगमन झाले. पावसाच्या मोठ्या विश्रांतीने चिंतेत असलेल्या बळीराजाच्या आशा या पावसामुळे पुन्हा पल्लवित झाल्या असून सर्वचजण सुखावले आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचून शहर पुन्हा जलमय झाले.जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच १ जून रोजी दमदार पावसाने हजेरी लावली लावली होती. त्यावेळी सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्हावासिय सुखावले. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस कमी-कमी होत गेला.मात्र १३ जून रोजी पुन्हा पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यानंतर उघडीप मिळाल्याने पेरणीला वेग आला व ठिकठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर दडी दिली. पेरणी झाली मात्र पाऊस गायब झाल्याने बळीराजासह सर्वच चिंतीत झाले.पावसाच्या दांडीने दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय? अशी चिंता असतानाच शुक्रवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले व सर्वांची चिंता मिटली. सोबतच या पावसाने उकाडा कमी होण्यासही मदत होणार असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
१३ दिवसानंतर वरुणराजाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:26 PM