जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते या भीतीने राज्य सरकार काल पासून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मात्र, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता लागू व्हायला अद्याप दोन दिवस बाकी असल्याचे सांगत जिल्हा स्तरावरील होत असलेल्या लगबगीला काहीसा दिलासा दिला आहे. याचबरोबर त्यांनी 2022 नंतर लोक श्रीमंतीकडे वाटचाल करतील अशी भविष्यवाणीही करून टाकली आहे.
राज्याचे महसूलमंत्री व जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुष्काळी आढावा व नियोजन समितीच्या बैठक घेतली. यासाठी ते शुक्रवारी सकाळी जळगावात आले आहेत. अजिंठा विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जि.प.सीईओ व मनपा आयुक्त यांच्यासोबत बैठक सुरु आहे. विश्रामगृहाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीत त्यांनी दुष्काळी उपाय योजना कामांचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना पाटील यांनी एप्रिल, मे महिना दुष्काळाच्या दृष्टीने अवघड जाणार असल्याचे सांगितले. मजुरांसाठी रोहयो अंतर्गत दिवसाला 212 रुपये मजुरी देण्यात येत आहे. 2022 पर्यंत देशातल्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील. उदा. मेट्रोची कामे पूर्ण होतील. त्याच्यावर होणारा खर्च बंद होईल. मागेल त्याला घर, मागेल त्याला शौचालय या योजनांचे लाभार्थी संपत चाललेत. यामुळे या योजनांवर खर्च होणारा निधी वाचणार आहे. यामुळ हा पैसा जनतेला श्रीमंत करण्यासाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले.