जळगाव : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मीळ वनस्पती, पक्षी, प्राणी प्रजातींचे आश्रयस्थान आहेत. आतापर्यंतच्या अनेक अभ्यासात या भागातून अनेक दुर्मीळ वनस्पती, पक्षी व प्राणी नोंदविले गेले असून, आता नव्याने सातपुड्यात टायटलरचा पर्णवटवट्या व कडा पंकोळी या दोन्ही पक्ष्यांची नोंद तब्बल ३५ वर्षांनंतर करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य राहुल व प्रसाद सोनवणे यांनी ही नोंद केली आहे.
यावल अभयारण्य व यावल प्रादेशिक वन विभागातील जंगलांत पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ समजल्या जाणाऱ्या काही पक्षी प्रजातींचे वास्तव्य आढळून आले आहे. त्यात प्रामुख्याने व्हीगोर्सचा सूर्यपक्षी, राखी रानपंकोळी, मातकट पायांची फटाकडी यासारख्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आहेत. आता टायटलरचा पर्णवटवट्या व कडा पंकोळी या उत्तरेला प्रजनन करणाऱ्या व विशेषत: पश्चिम घाटात हिवाळी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे.
आतापर्यंत दोनवेळा करण्यात आली होती नोंद१. कडा पंकोळीची खान्देशातून जे. डेव्हिडसन या ब्रिटिश अधिकाऱ्याने १८८४मध्ये त्याच्या ‘रफ लिस्ट ऑफ बर्ड्स ऑफ वेस्टर्न खान्देश’ या ‘स्ट्रे फिदर्स’ विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या निरीक्षणात नोंद केलेली आढळते. तसेच १९८७च्या सलीम अली व डिलन रिप्ली यांच्या ‘हॅण्डबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया ॲण्ड पाकिस्तान’ या ग्रंथाच्या ५ व्या व ८ व्या खंडात अनुक्रमे कडा पंकोळी (सातपुडा) व टायटलरचा पर्णवटवट्या (पश्चिम खान्देश) या पक्ष्यांच्या नोंदींचा उल्लेख आढळतो.
२. प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ पामेला रासमुसेन यांच्या संशोधनातही संकटग्रस्त पर्णवटवट्याचा डेव्हिडसनच्या धुळे येथील नोंदींचा उल्लेख आढळतो. त्यानंतर मात्र अभ्यासकांना खान्देशातून या पक्ष्यांच्या आढळण्याविषयी कोणत्याही नोंदी मिळवता आल्या नाहीत. म्हणजेच मोठ्या कालखंडानंतर या पक्ष्यांच्या खान्देशातून नोंदी घेण्यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना यश आले आहे. शेजारील पूर्वेकडील मेळघाटातही या दोन्ही पक्षी प्रजाती आढळल्या आहेत.------टायटलरचा पर्णवटवट्या हा आय. यु. सी. एन.च्या संकटग्रस्त पक्षी सूचित ‘धोक्याजवळ’ या गटात समाविष्ट आहे. हा हिरवट-राखाडी रंगाचा फायलोस्कॉपस प्रजातीतील वटवट्या असून, याची चोच लांब व काळी असते. अभयारण्यात हा पक्षी महिनाभर दिसून आल्याने हा येथे हिवाळ्यात वास्तव्य करत असावा, असा अंदाज आहे. तसेच हे पक्षी पश्चिम घाटाव्यतिरिक्त सातपुड्यातील दाट जंगलात हिवाळी वास्तव्य करत असण्याची शक्यता आहे.- प्रसाद सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था
कडा पंकोळी धूसर तपकिरी रंगाचा हिवाळी स्थलांतरित पक्षी असून, सामान्य धूसर पाकोळीपेक्षा आकाराने थोडा मोठा व त्याची पोटाकडची बाजू पांढरट असते. हा पक्षी उडताना शेपटीच्या आतल्या बाजूला असलेले पांढरे ठिपके स्पष्टपणे दिसतात. हे पक्षी तुरेवाली वृक्षपाकोळी, सामान्य धूसर पाकोळी यासारख्या पक्ष्यांसोबत डोंगराळ भागातील कडेकपारी तसेच खडकाळ भागात हवेतल्या हवेत कीटक पकडताना दिसून येतात.- राहुल सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था