लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील सत्ताधारी भाजपाने आपल्या चार स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा मार्च महिन्यात घेण्याचे निश्चित केले आहे. आता शिवसेनेतही स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांच्याऐवजी इतरांना संधी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, शिवसेनेकडून मार्च महिन्यातच स्वीकृत नगरसेवकांचा बदल करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिली आहे.
भाजपासोबतच शिवसेनेकडूनही स्वीकृत नगरसेवक बदलविण्यात येणार असल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मनपात शिवसेनेचा एकच स्वीकृत नगरसेवक आहे. त्यामुळे नगरसेवकपदाची जागा एकच असली तरी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सेना नेतृत्वाला स्वीकृत नगरसेवकाची निवड करताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. याबाबत माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व संपर्क प्रमुख संजय सावंत हेच निर्णय घेणार असल्याची माहिती तायडे यांनी दिली.
जुने-नवा वाद, सेनेसमोर पेच
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत जुने व नवे शिवसैनिक असा वाद सुरु आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांप्रमाणेच शिवसेनेत देखील गटबाजी वाढली आहे. शिवसेनेचे आंदोलने देखील आता तीन भागात होतात. यामुळे एका जागेसाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एका गटाकडून खुबचंद साहित्य, विराज कावडीया, नितीन सपके यांचे नाव पुढे केले जात आहे. तर दुसऱ्या गटाकडून गजानन मालपुरे यांच्यासह निलेश पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे. मालपुरे यांच्या नावासाठी काही जुने शिवसैनिक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच दोन्ही गटाकडून आता चांगलीच मोर्चेबांधणी सुरु झाली असून, नेत्यांकडे पक्षासाठी केलेल्या कामाचे दाखले दिले जात आहेत. नाव एक व इच्छुक अनेक असल्याने शिवसेना नेतृत्वालाही एकाची निवड करताना पेचप्रसंगाला सामारे जावे लागणार आहे.