लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत भाजपकडून सत्ता खेचल्यानंतर आता शिवसेनेतच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची आतापासून तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिकेत भाजपची सत्ता घालवून शिवसेनेची सत्ता आणण्यात आपला कितपत सहभाग आहे हे दाखविण्यासाठी आता शिवसेनेतच एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे.
महापालिकेत शिवसेनेने ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणत, भाजपला सत्तेवरून खाली खेचले. अजूनही शिवसेनेकडून भाजपला अधूनमधून धक्के देण्याचे प्रकार घडतच आहेत. शिवसेनेच्या या ऐतिहासिक सत्तांतरामध्ये अनेक स्थानिक नगरसेवक व नेत्यांच्या सहभाग आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, विद्यमान उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, विद्यमान महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह संपर्कप्रमुख विलास पारकर व संजय सावंत यांचाही सहभाग या सत्तांतरात आहे. केवळ महापालिकेत सत्ता आणण्यासाठी हे सत्तांतर झाले नसून आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहराची जागादेखील शिवसेनेकडे यावी यासाठीदेखील पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.
या विजयाचे हीरो करण्यासाठी चढाओढ
महापालिकेतील सत्तांतरातील विजयाचा हीरो होण्यासाठी शिवसेनेतच चढाओढ सुरू झाली आहे. विद्यमान उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नवग्रह मंडळातील नगरसेवक सेनेत आणल्यानंतर, शिवसेनेतील सुनील महाजन, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे यांच्यासारख्या दिग्गजांनीदेखील आपली ताकद लावून भाजपचे काही नगरसेवक आपल्या बाजूने खेचून या विजयात आपला वाटा देण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीदेखील या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत या विजयात सिंहाचा वाटा घेतला आहे. आता जरी महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली असली तरीही अन्य पक्षांचे काही नगरसेवक फोडून, पक्षश्रेष्ठींकडे आपली दखल घेण्यासाठी आता शिवसेनेत चढाओढ निर्माण झाली आहे.
कुलभूषण पाटील होऊ शकतात शिवसेनेचा मराठा चेहरा
जिल्ह्यात जळगाव महापालिकेत सोबतच मुक्ताईनगर नगरपंचायतमध्येदेखील शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता काबीज करण्याचे सूत्र आता तयार केले आहे. शिवसेनेकडून पहिल्यांदा आक्रमकपणे जिल्ह्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. जळगाव महापालिकेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिकेतील विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यातच त्यांचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी थेट संपर्क वाढला आहे. या घटनाक्रमामुळे त्यांचे आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे.
सेनेत वाढतोय इच्छुकांचा भरणा
शिवसेनेत आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचा भरणा वाढत जात असल्याचेही पाहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनील महाजन यांच्यासह ललित कोल्हे व कुलभूषण पाटील ही नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे विधानसभेचे तिकीट मिळविण्यासाठी आता शिवसेनेत चढाओढ निर्माण झाली आहे.