उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात मोंढाळे, शिंदी, कंडारी, महादेव माळ यासह अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ह्या आठवड्यात पुन्हा मांडवे दिगर भिलमडी तांडा, मुसळ तांडा आदी काही गावांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच शहरांमध्ये पाण्यासाठी फिरफिर सुरू असताना ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी आबालवृद्धांना रखरखत्या उन्हात भटकावे लागत आहे.दरम्यान, तालुक्यात नऊ गावांमध्ये दहा विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, तर चार गावांमध्ये सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिली.दरम्यान, सोमवारी विल्हाळा येथे विहीर खोलीकरण प्रस्ताव आला आहे, तर मांडवेदिगर येथे दोन बोरवेल मुशाळतांडा येथे एक व भिलवडी तांडा येथे एक बोरवेल करण्याचा प्रस्ताव आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एस. लोखंडे यांनी दिली.मोंढाळा, शिंदी , खंडाळे आदी परिसरात विहिरीनी पावसाळ्यातच तळ गाठला होता. त्यामुळे या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही या गावांमध्ये टँकरची मागणी आहे.महादेव माळ येथे दहा लाखांच्या विहीरला पाइपलाइनची प्रतीक्षामहादेव माळ या बंजारातांडा वस्तीवर गेल्या वर्षापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे कुºहे (पानाचे) गावाजवळील पाझर तलावावरून पाणी योजना राबविण्यात आली आहे. मात्र तलावातच पाणी नाही. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे, तर येथे मनरेगा योजनेंतर्गत जवाहर विहिरीसाठी तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. ही विहीर खोदण्यात व बांधकामही करण्यात आले आहे. मात्र या विहिरीला पाणी किती आहे, हा प्रश्न उपस्थित झाला असून, या विहिरीवर राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे लवकरच अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून ते तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता लोखंडे यांनी दिली.मे महिन्यात तांत्रिक मंजुरीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्यामुळे एकंदरीत या वर्षी या योजनेचे पाणी महादेव तांडा या वस्तीला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर , विहीर खोदून वर्ष झाले. मात्र पाईपलाईन मंजूर करणे किंवा काम करणे यास विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या विहिरीला पाणीच लागले नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या विहिरीवरून पाईपलाईन करण्याचे टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. यावर्षी पाइपलाइन केली असती गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला तर, विहिरीत पाणी नसल्याचे उघड होईल व कोरड्या ठिकाणी विहीर खोदून पैसे काढून घेतल्याचे समोर येऊन काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा भांडाफोड होईल या भीतीने पाईपलाईन करण्यासाठी तर टाळाटाळ करण्यात येत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र योजनेचे काम अद्यापही सुरू नसल्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर विहिरीला पाणी असल्यास पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.नऊ गावांसाठी दहा विहिरी अधिग्रहिततालुक्यातील कन्हाळे खुर्द (१), शिंदी (३), खेडी व चोरवड (१), मोंढाळा (१), एक टाकळी (१), खंडाळा (१) व कन्हाळे बुद्रूक (१) व गोंभी (१) अशा नऊ गावांसाठी १० विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.चार गावात सहा टँँकरतालुक्यातील कंडारी येथे दोन, महादेव माळ येथे एक कन्हाळा बुद्रूक येथे एक व भुसावळ ग्रामीण येथे दोन असे सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिली.
भुसावळ शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 4:31 PM
भुसावळ तालुक्यात मोंढाळे, शिंदी, कंडारी, महादेव माळ यासह अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात ह्या आठवड्यात पुन्हा मांडवे दिगर भिलमडी तांडा, मुसळ तांडा आदी काही गावांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देया आठवड्यात नवीन गावांची भर पडणारमहादेव तांडा विहिरीसंदर्भात नागरिकांना संशय नऊ गावांसाठी दहा विहिरी अधिग्रहित