लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार केरळ, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सुरु झाला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’ मुळे अनेक पक्षी, कोंबड्या दगावत असून, चिकन खाल्ल्यांने देखील ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार होतो. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. यामुळे चिकनच्या मागणीत तब्बल ४० टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे पोल्ट्रीधारक देखील हबकले असून, अनेक पोल्ट्रीधारकांनी निर्जंतुकीरणासाठी धावाधाव सुरु केली आहे. तसेच प्रशासनाने देखील त्या दृष्टीने उपाययोजना देखील सुरु केल्या आहेत.
देशातील काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार होत असला तरी राज्यात ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यूची देखील सुदैवाने कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. मात्र, प्रशासन सतर्क असून, पक्षी मित्रांना देखील अलर्ट करण्यात आले आहे. कोंबड्यापासून याचा प्रादुर्भाव होत असल्याचा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याने चिकनच्या मागणीत मोठी घट झाली आहे. शहरात दररोज सरासरीने १० टनापेक्षा अधिकची चिकनची विक्री होत असते, मात्र ही विक्री ६ टनपर्यंत आली आहे. चिकन ऐवजी आता खवय्ये मटनला पसंती देत आहेत. यासह कोरोनामध्ये मागणी वाढलेल्या अंड्यांची आता ‘बर्ड फ्ल्यू’ मुळे मागणी काही प्रमाणात घटली आहे.
राज्य शासनाने ‘बर्ड फ्ल्यू’ संदर्भात आदेश काढले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार असून, मृत पक्षी आढळल्यास तत्काळ प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-डॉ. ए. डी. पाटील, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा
हिमाचल प्रदेश आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने धुमाकूळ घातला आहे. अद्याप राज्यात त्याचा प्रादुर्भाव दिसून आलेला नसला तरी प्रशासन मात्र त्यासाठी सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील पाणवठे किंवा जेथे पक्षी जास्त येतात. त्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच धरण किंवा अभयारण्यातदेखील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. तेथे मृत पक्षी आढळलेल्या धरणांवरील उपअभियंता आणि अभयारण्यांसाठी वनविभागाने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पशु संवर्धन विभागाकडून
अशी घेतली जातेय काळजी
- आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या अडचणींवर निवारण करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीमची स्थापना करण्यात आली आहे.
-जळगावातील पाणवठ्यांवर स्थलांतरित पक्षी हे दरवर्षी तीन हजार किमीचा प्रवास करून हिवाळ्यात दाखल होत असून, अनेक पक्षी याआधीच दाखल झाले आहेत. पक्षी मित्रांच्या मदतीने अशा पक्ष्यांचा शोध घेवून, मृत पक्ष्यांची माहिती मागवली जाणार.
-जिल्ह्यात अजून तरी मृत पक्षींची नोंद नाही