जामनेर : भाजपचे नेते एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेशाचा तालुक्यातील भाजपवर परिणाम होईल अशी स्थिती नाही. खडसे याना मानणारे कार्यकर्ते तालुक्यात असले तरी ते आमदार गिरीश महाजन यांची साथ सोडून खडसेंसोबत जातील, असे चित्र सध्या तरी नाही.तालुक्याच्या राजकारणात गिरीश महाजन यांना विरोध करणारे राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे काही नेते खडसे यांच्याशी गेल्या चार वर्षांपासून जवळीक ठेवून होते व आहे. खडसे यांनीदेखील त्यांना तितक्याच आपुलकीने मदत केली हे लपून राहिले नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जामनेर पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरोधकांना मुक्ताईनगरमधून रसद पुरविली गेल्याची चर्चा राजकीय गोटात चांगलीच रंगली होती.वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने खडसे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या बंडखोरीसोबत जामनेरमधून कोण असेल याची चर्चा रंगली होती. खडसे यांच्या वाढदिवसाच्या पहूर कसबे येथे लागलेल्या शुभेच्छा फलकांची चर्चादेखील राजकीय क्षेत्रात खळबळ उडविणारी ठरली होती.नाही म्हटले तरी आजही तालुक्यातील काही भाजप कार्यकर्ते खडसेंचे पाठीराखे म्हणून ओळखले जातात. हे कार्यकर्ते येत्या काही दिवसात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यात पहूर, नेरी, नाचणखेडे, शेंदुणी येथील काही कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. महाजन यांच्याशी काडीमोड घेऊन खडसेंसोबत जाण्याची मानसिक तयारी काहींनी केल्याचेही समजते.पंचायत समिती, बाजार समिती, शेतकरी संघ, जामनेर व शेंदुर्णी नगरपंचायत भाजपकडे असून, त्यावर कोणताही परिणाम संभवत नाही. मात्र शेतकरी संघ व बाजार समितीच्या निवडणूक डोळ्यासमोर असल्याने त्यात काहीही घडू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
खडसेंच्या पक्षांतरानंतर_ जामनेरला भाजपातून सोबत कोण जाणार? चर्चेला उकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 3:15 PM