अजय कोतकर
चाळीसगाव - दिवाळी संपल्यानंतर इच्छुक वधूवरांच्या आईवडिलांना वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. एकदाच का तुळशी विवाह झाला की, विवाह जुळविण्याचा सपाटा चालू होतो. २० नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह झाला असला तरी १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत गुरू लोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नसल्याने विवाह इच्छुकांना १२ डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र डिसेंबर ते मे २०१९ पर्यंत जवळपास ७१ तारखा लग्न मुहूतार्साठी योग्य असल्याचे मानले जाते.ग्रामीण भागात कुणी मुलगी देता का? हो असा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे. वधूपेक्षा वरांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. वधूच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकरी मुलगा नको, नोकरीला असला पाहिजे गाडी, बंगला सर्व काही व्यवस्थित असले पाहिजे अशा वाढत्या अपेक्षा असल्याने ग्रामीण भागात वरांच्या पालकांची मोठी डोकेदुखी झाली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यात लग्न मुहूर्त नव्हते. सुटीचा महिना असून केवळ विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांची अडचण झाली होती. परंतु यावर्षी मार्च, एप्रिल, मे या महिन्यात जास्तीत जास्त विवाह होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोजके मुहूर्त असल्याने वधू वरांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. चालू हंगामात मे २०१९ पर्यंत विवाहाच्या तारखा असल्याने वधू वरांना किमान ६ महिने तरी कोणतेही विघ्न नसल्याकारणाने शुभमंगल निर्विघ्नपणे पार पाडता येणार आहेत .