- कुंदन पाटील
जळगाव - शिवसेनेचे महाराष्ट्रातील १६ आमदार सुरत विमानतळानजीकच्या मेरीएट (जुनी ग्रँण्ट भगवती) हॉटेलमध्ये थांबले आहेत. वेगवेगळ्या नावाने रुम राखीव असलेल्या या हॉटेलमध्ये काँग्रेसचे काही आमदार येणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठीही व्हीआयपी सूट राखीव ठेवण्यात आले आहेत.
सुरत येथे गुजरात भाजप अध्यक्ष व खासदार सी.आर.पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील सेना व काँग्रेस आमदारांची सोय करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी सोमवारी सायंकाळी चार वेगवेगळ्या हॉटेल्स व रिसोर्टला व्हीआयपी, सूट बुक केले आहेत. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे १६ आमदार सुरतकडे रवाना झाले. रात्री दीडला मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतकडे रवाना झाले.
रुम वेगवेगळ्या नावाने राखीव-
दरम्यान सुरत विमानतळ रस्त्यावर असलेल्या मेरीएट हॉटेलला १६ आमदार थांबले आहेत. या आमदारांसाठी वेगवेगळ्या नावाने रुम बुक आहेत.
पाटील-शिंदे भेट-
पहाटेच्या सुमारास सी.आर.पाटील व एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दोघांच्या भेटीदरम्यान आमदारांना दूर ठेवण्यात आले होते. चहापान झाल्यानंतर शिंदे व पाटील एका कारने रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ आमदारही रवाना झाले.
जळगावचे चौघे-
एकनाथ शिंदेंच्या वारीमध्ये जळगाव जिल्ह्यातील चौघा आमदारांचा समावेश आहे.
सकाळी घेतला खमणीचा आनंद-
महाराष्ट्रातील या आमदारांनी सकाळी दहाला नाश्ता घेतला. कोकणातील एका आमदाराने झोप झाली नाहीये, म्हणून हलकाफुलका नाश्ता द्या म्हणून संबंधितांना सूचना केली. तेव्हा खमणीसह (खमंग) अन्य गोडधोड पदार्थांवर त्यांनी ताव मारला.
अमित शहांकडे रिमोट
खासदार सी.आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे विश्वासू आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वीच नवी दिल्लीतून सुरतला पाठविण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पाटील सुरतमध्ये दाखल झाले. पाटील व शहा यांच्यात सातत्याने संपर्क सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.