विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाजारपेठ अनलॉक होताच काही दिवस भाववाढ होऊन नंतर संपूर्ण जून महिना सातत्याने घसरण होत गेलेले सोने २७ दिवसांनी पुन्हा ४८ हजार ८५० रुपयांवर पोहोचले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे, तर चांदी गेल्या आठवड्यापासून ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांनंतर १ जूनपासून बाजारपेठ सुरू झाली आणि सोने-चांदीच्या भावात १० दिवस भाववाढ होत राहिली. त्यामुळे १० जून रोजी सोने ५० हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर, मात्र त्यात घसरण होत गेली व २५ जूनपर्यंत ते ४७ हजार ८०० रुपयांवर आले होते. नंतर १ जुलैपासून दररोज भाववाढ होत गेली. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी २०० रुपयांनी वाढ होऊन ४८ हजार २०० रुपयांवर पोहोचले. ही वाढ कायम राहत आता १२ जुलै रोजी सोने ४८ हजार ८५० रुपयांवर पोहोचून १६ जूननंतर पुन्हा ते ४९ हजारांच्या जवळ पोहोचले आहे.
अशाच प्रकारे १ जुलैपासून चांदीच्याही भावात वाढ होत जाऊन ती ७१ हजारांवर पोहोचली आहे. ५ जुलैपासून चांदी याच भावावर आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.