दुर्लक्ष : जिल्हाभरात चार हजार ग्राहकांकडे थकबाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे अवाजवी वीजबिल असल्याच्या तक्रारी करत महावितरणच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, दुसरीकडे बीएसएनएलच्या ग्राहकांनीही टेलिफोन बिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात सध्या २८ हजार ग्राहकांपैकी चार हजार ग्राहकांकडे टेलिफोन बिलाची थकबाकी असल्याचे बीएसएनएलचे जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक संजय केशरवाणी यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत मोबाइलची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे घरगुती टेलिफोन ग्राहकांची संख्या २५ टक्क्यांवर आली आहे. त्यातही बहुतांश ग्राहक विविध सरकारी कार्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, बँका व काही घरगुती नागरिकांकडेच टेलिफोनचा वापर सुरू आहे. जिल्ह्यात एकेकाळी दोन लाखांवर असलेली बीएसएनएल ग्राहकांची मोबाइलमुळे सध्या २८ हजार ग्राहकांवर आली आहे. तर येत्या काही वर्षांत ती संख्याही कमी होणार असल्याची भीती बीएसएनएलतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या ग्राहक दर महिन्याला येणारे टेलिफोन बिलही भरत नसल्यामुळे तोट्यात असणारे बीएसएनएल अधिकच तोट्यात जात आहे. जे ग्राहक नोटीस बजावूनही बिल भरत नाही,अशा ग्राहकांचे सुरुवातीच्या पंधरा दिवसांत ''आउटगोइंग'' व नंतर ''इनकमिंग'' कनेक्शन कट करण्यात येत आहे. दर महिन्याला असे बिल न भरणारे ३०० ते ३५० ग्राहकांचे कनेक्शन कट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
ऑप्टिकल फायबर कनेक्शनला मागणी वाढली
सध्या कोरोना काळात अनेक नोकरदार वर्गाचे घरी बसून काम सुरू आहे. त्यामुळे जलदगतीच्या इंटरनेटसाठी नागरिकांकडून ऑप्टिकल फायबर कनेक्शनची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात ऑप्टिकल फायबर कनेक्शनचे पाच ते सहा हजात कनेक्शन वाढले असल्याचेही केशववाणी यांनी सांगितले.