जळगाव : गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हा रुग्णालयाचा बट्टयाबोळ झाला असून जिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारा, अशा सूचना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या, मात्र तरीदेखील जिल्हा रुग्णालयात एका खाटेवर दोन-तीन रुग्ण टाकण्यासह रुग्णांचे हाल सुरूच असल्याचे चित्र २० दिवसांनंतरही कायम आहे.जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढून जागा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन अथवा तीन रुग्ण टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. शुक्रवारीदेखील ही समस्या कायम होती.गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असून आता वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने येथे रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. गुलाबराव पाटील यांनी आरोग्य विभाग व परिवहन विभागाची ७ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी आरोग्य सेवेतील त्रुटींवर बोट ठेवत गरीब रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत संबंधिताना जाबही विचारला होता.समस्या कायमजिल्हा रुग्णालयात जागेअभावी अनेक प्रसूत महिलांना सतरंजी टाकून झोपवले जाते. त्या बाबत नवीन वॉर्डास मंजूरी मिळेल तेव्हा मिळेल पण पर्यायी व्यवस्था करा, असे राज्यमंत्री पाटील यांनी सूचविले होते. सोबतच तुमच्या आया बहिणींचे रुग्णालयात असे हाल झालेले तुम्हाला चालेल का? नाही काही तर गाद्यांची व्यवस्था करा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला होता, मात्र तरीदेखील समस्या कायम असून गेल्या आठवड्यात एका सिझेरियन झालेल्या महिलेला परिचारिकेने कक्षातून हाकलून दिले होते.त्यानंतर पुन्हा २७ रोजी एका खाटेवर तीन-तीन रुग्णांना टाकण्याची वेळ आली होती. त्यामुळे रुग्णांचे हाल कायम असल्याचे चित्र राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कायम असल्याचे शुक्रवारीदेखील दिसून आले.चांगल्या सेवा देण्यावर भर - अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरेजिल्हा रुग्णालयातून प्रसूतीसाठी महिलांना इतरत्र पाठविले जात नाही. रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने येथेच चांगले उपचार करण्यावर आमचा भर असल्याचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी सांगितले. रुग्णाला बाहेर पाठविल्यास वेगवेगळे आरोप होतात, मात्र तसे नसून गंभीर रुग्ण असला तरच त्याला इतरत्र पाठविले जाते. आलेल्या प्रत्येक रुग्णावर येथेच चांगले उपचार करण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत असल्याचे डॉ. खैरे म्हणाले.
राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही जळगाव जिल्हा रुग्णालय समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:18 PM
२० दिवसांनंतरही रुग्णांचे हाल कायम
ठळक मुद्देचांगल्या सेवा देण्यावर भर - अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे गरीब रुग्णांचे हाल होत असल्याबद्दल तीव्र संताप