लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर दोन दिवसांपासून स्वाभिमानी रयत आंदोलन या संघटनेने उपोषण सुरू केले होते. वाघुर प्रकल्पात खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीस, शाखा अभियंत के.बी. देशमुख, उपअभियंता सी.के. पाटील आणि बोगस सुरक्षा रक्षक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यावर संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे.
वाघुर प्रकल्पात मुळ सुरक्षा रक्षकांना डावलून बोगस सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे हजेरी पत्रक आणि शिफारस पत्र रद्द करून त्यांची नियुक्ती रद्द करावी. तसेच मुळ सुरक्षा रक्षकांन नियुक्त करावे, अशी मागणी संघटनेने केली होती. सुरक्षा एजन्सीने बनावट कागदपत्रे केली असल्याचा आरोप देखील या संघटनेने केला होता. त्यासाठी उपोषण सुरू होते. त्याबाबत शुक्रवारी रात्री उशिराने कार्यकारी अभियंता वराडे यांनी उपअभियंता विनोद पाटील आणि भांडारपाल चुनाडे यांच्याकडे पत्र दिले. या दोघांनी विजय निकम यांच्या मध्यस्थीने स्वाभिमानी आंदोलनाचे जिल्हाअध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांना पत्र देत उपोषणाची सांगता केली. यावेळी सुभाष वाघ, आर.पीआयचे भिमराव निकम, मंगल भालेराव,दलित पँथरचे राजु महाले, सुनिल सुरवाडे उपस्थित होते.