लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ११ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. विषय समिती सदस्यांची एक वर्षाची मुदत ऑगस्ट महिन्यातच संपली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विषय समिती सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर सहा महिन्यानंतर नव्याने विषय समित्या गठीत करण्यात आल्या असून, यामध्ये शिवसेना सदस्यांचाही सहभाग करण्यात आला आहे. गेल्यावेळेसच्या समित्यांमध्ये सहभागी होण्यास शिवसेना सदस्यांनी नकार दिला होता. मात्र, यावर्षीच्या समित्यांमध्ये शिवसेना सदस्यांचाही सहभाग आहे.
मनपात सत्ता संपादन केल्यानंतर काही महिन्यांमध्येच विषय समित्या गठीत करणे अपेक्षित असते. मात्र, पहिल्या वर्षात देखील सत्ताधारी भाजपने वर्षभरानंतर या समित्या गठीत केल्या होत्या. तर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या समित्या गठीत होण्यास सहा महिने उशीर झाला आहे. दरम्यान, ११ समित्या गठीत करण्यासंदर्भाचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या महासभेमध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी व शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी आपआपल्या पक्षातील सदस्यांची नावे, महापौरांकडे सादर केली. महापौरांनी या नावांची महासभेत घोषणा केली. महासभेने या प्रस्तावला मंजुरी दिली असून, प्रत्येक समितीमध्ये पाच ते सहा सदस्यांचा समावेश आहे.
अकरा समित्या गठीत
बांधकाम समिती प्रमुखपदी मुकूंदा सोनवणे, अतिक्रमण समिती प्रमुख पदी दत्तात्रय कोळी, स्वच्छता समिती प्रमुख म्हणून जितेंद्र मराठे, पाणी पुरवठा समिती प्रमुख म्हणून प्रवीण कोल्हे, दवाखाना समिती डॉ.चंद्रशेखर शिवाजी पाटील, नियोजन समिती प्रमुख म्हणून सदाशिव ढेकळे, आस्थापना प्रमुख म्हणून ज्योती चव्हाण, विधी समिती प्रमुख म्हणून अॅड.दिलीप पोकळे, वाहन व्यवस्था समितीप्रमुख विजय पाटील, शिक्षण समिती प्रमुख सरीता नेरकर, तर विद्युत समिती प्रमुखपदी पार्वताबाई भील यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेकडून ९ समित्यांवर नितीन बरडे
महापालिकेतील ११ विषय समित्यांमध्ये शिवसेनेच्या प्रत्येकी २ सदस्यांचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने ११ पैकी ९ समित्यांमध्ये नितीन बरडे यांना संधी दिली आहे. तर इतर सदस्यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.