कोरोनामुळे एसटी प्रवासी वाहतूकही सहा महिने बंद होती. प्रवासी उत्पन्नाचा स्रोत पूर्णपणे बंद असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पर्यायी उत्पन्न म्हणून एसटीने मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. महामंडळाच्या जुन्या बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून या ट्रकने व्यापारी व उद्योजकांचा माल राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला जात आहे. लॉकडाऊनमध्ये खासगी ट्रक बंद असल्यामुळे महामंडळाच्या या ट्रकनेच व्यापाऱ्यांचा माल पोहोचविण्याचे काम केले. खासगी ट्रकपेक्षा काहीसे कमी भाडे असल्यामुळे व्यापारी व उद्योजकानींही महामंडळाच्या या मालवाहतूक सेवेला पसंती दिली आहे. जळगावसह जिल्हाभरात ५० हून अधिक ट्रक महामंडळाकडे उपलब्ध आहे. बुकिंग केल्यानंतर संबंधित उद्योजकाचा माल सुरक्षितपणे पोहोचविण्यात येत आहे. माल पोहोचविल्यानंतर बाहेरगावाहून ट्रक येताच, स्थानकात लगेच सॅनिटाईजरने ट्रकचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच ट्रकवरील चालकांचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.
उत्पन्नात जळगावची आघाडी :
महामंडळाने पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणून या मार्गाचा स्वीकार केल्यानंतर, जळगाव विभागाने सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळाले आहे. जिल्हाभरातील अकरा डेपोंमधून मालवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिवसा व रात्रीदेखील या ट्रक माल पोहोचविण्यासाठी जात असून, यासाठी स्वतंत्र चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत मालवाहतुकीतून जळगाव विभागाने २ कोटी १९ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. यामध्ये एकट्या जळगाव आगाराने ३४ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
बुकिंग केल्यानंतर तत्काळ ट्रक उपलब्ध :
संबंधित उद्योजकांनी मालाच्या वाहतुकीसाठी ट्रक बुकिंग केल्यानंतर महामंडळातर्फे तत्काळ ट्रक उपलब्ध करून देण्यात येत आहे. जळगाव विभागाकडे सध्या ५९ ट्रक असून, भविष्यातही आणखीन ट्रक वाढविण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले. ट्रक बुकिंगसाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.