जळगाव: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान,१५ ते १७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाची शक्यता आधी वर्तविली जात असताना, सप्टेंबरमधील पाऊस ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड व जोरदार पाऊस असा बदललेला पावसाचा पॅटर्न दिसून येत आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली, त्यानंतर जुलै महिन्यात सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तर सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान १०९ मिमी पाऊस झाला. तर आता १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा ९० ते १०० मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. जर एवढा पाऊस झाला तर जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस एलनिनोचा परिणाम असतानाही होऊ शकतो.
पुन्हा तयार होतोय कमी दाबाचे क्षेत्र
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे जिल्ह्यात पाऊस झाला होता. आता पुन्हा काही दिवसांच्या खंडानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. १४ सप्टेंबरपासून हे क्षेत्र ओडिशामार्गे छत्तीसगड, विदर्भ करत उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे १५ ते १७ दरम्यान जळगाव जिल्ह्यासह नंदुरबार, मालेगाव, धुळे जिल्ह्यातील काही भागात कन्नड परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असल्याची सध्या स्थिती आहे. १५ नंतर कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे ओसरेल, त्यामुळे पुन्हा जळगाव जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊ शकते. त्यानंतर सप्टेंबर अखेरीस परतीचा पाऊस सुरू होऊन, १५ ते २० ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस थांबू शकतो.- प्रा. सुरेश चोपणे, हवामान तज्ज्ञ.