जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या तीन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी सुवर्णबाजार उघडताच भाववाढीने त्यास सुरुवात झाली. चांदीच्या भावात ३०० रुपयांनी, तर सोन्याच्या भावात १५० रुपयांनी वाढ झाली. बंदच्या या तीन दिवसांत जनता कर्फ्यूमध्ये सुवर्णबाजारातील १५० ते १६० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. दरम्यान, चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांत एक हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती ६८ हजार ३०० रुपयांवर पोहोचली. सोन्याच्या भावात मात्र या १० दिवसांत चढउतार पाहायला मिळाला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्चदरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला. १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेनंतर हा जनता कर्फ्यू संपल्यानंतर व्यवहार सुरू झाले. यामध्ये सुवर्णनगरीचा सुवर्णबाजारही सुरू झाला. तीन दिवस बंदनंतर सुवर्णबाजारात तेजीने सुरुवात झाली. १२ मार्च रोजी जनता कर्फ्यू सुरू होण्यापूर्वी ११ मार्च रोजी सोने ४५ हजार ८०० रुपये, तर चांदी ६८ हजार रुपयांवर होती. त्यानंतर सलग तीन दिवस सुवर्णबाजार बंद राहिला. या दरम्यान सुवर्णबाजारातील जवळपास १५० ते १६० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यानंतर सोमवार, १५ मार्च रोजी सुवर्णबाजार उघडताच चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ती ६८ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात १५० रुपयांची वाढ होऊन ते ४५ हजार ९५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.
१० दिवसांपासून चांदीत भाववाढ
४ व ५ मार्च रोजी मोठी घसरण झालेल्या चांदीच्या भावात ६ मार्चपासून पुन्हा वाढ होत आहे. ६ रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६७ हजार रुपयांवर पोहोचली. त्यानंतर ७ रोजी त्याच भावावर स्थिर राहून ८ रोजी ती ६७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. त्यानंतर ९ रोजी त्याच भावावर स्थिर राहिली व १० रोजी त्यात ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ६८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. ११ रोजी त्याच भावावर स्थिर राहिली व १२ ते १५ दरम्यान जनता कर्फ्यूमुळे सुवर्णबाजार बंद होता. सोमवारी त्यात पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली व ती ६८ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.
सोन्याच्या भावात मात्र या १० दिवसांत चढउतार राहिला. ६ मार्च रोजी ४५ हजार ८०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७ रोजी १०० रुपयांची घसरण झाली. ८ रोजी ते त्याच भावावर स्थिर राहिले. ९ रोजी मात्र त्यात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ४६ हजार रुपयांवर पोहोचले. त्यानंतर १० रोजी त्यात पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ४५ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. ११ रोजी ते याच भावावर स्थिर राहिले. १२ ते १५ दरम्यानच्या बंदनंतर १५ रोजी सोन्यात १५० रुपयांची वाढ झाली.
सट्टाबाजारामुळे सोने-चांदीत चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे.