लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोने-चांदीच्या भावात दोन दिवसात एक हजार ८०० रुपयांची घसरण होऊन चांदी ६५ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली. अडीच महिन्यानंतर चांदीचे भाव पुन्हा ६६ हजार रुपयांच्या खाली आले आहे. एकीकडे चांदीत मोठी घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र किरकोळ चढ-उतार सुरू आहे. शुक्रवारीदेखील सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात दोन दिवसात तर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. २४ मार्च रोजी ६७ हजार ५०० रुपये असलेल्या चांदीच्या भावात २५ रोजी एक हजार रुपयाची घसरण होऊन चांदी ६६ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली. त्यानंतर २६ मार्च रोजी पुन्हा ६०० रुपयांची घसरण होऊन चांदी ६५ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली.
यापूर्वी ९ जानेवारी रोजी चांदीच्या भावात पाच हजार ८०० रुपयांची ही घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. ११ जानेवारीपर्यंत ६३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत खाली उतरली होती. मात्र त्यानंतर चांदीच्या भावात वाढ होत गेली. फेब्रुवारी महिन्यात ७३ हजार रुपये प्रति किलो वर पोहोचली होती. त्यानंतर मात्र चढ उतार सुरू राहून ६६ हजारापर्यंत खाली आली होती. मात्र २६ मार्च रोजी अडीच महिन्यांनी पुन्हा चांदी ६६ हजाराच्या खाली येत ६५ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली.
सोन्याच्या भावात मात्र किरकोळ चढ-उतार सुरू आहे. २३ मार्च रोजी ४५ हजार ७०० रुपये असलेल्या सोन्याच्या भावात २४ रोजी १०० रुपयांची वाढ होऊन ते ४५ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. २५ रोजी याच भावावर सोने स्थिर होते. मात्र २६ मार्च रोजी त्यात २०० रुपयांची घसरण होऊन सोने ४५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
सट्टा बाजारातील कमी अधिक खरेदीमुळे सोने-चांदीच्या भावात हा फरक होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.