जळगाव : पाच वर्ष सत्तेत असताना व त्यानंतर युती करायची की नाही? किती जागांवर तडजोड करायची याबाबत अगदी माघारीच्या तारखेपर्यंत घोळ घालत मतदानाच्या तारखेपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या भाजप-सेना युतीत मतदान पार पडल्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या मुक्ताईनगर मतदार संघातील बंडखोरीबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. केवळ त्यांनी राजीनामा दिल्याचे व पक्षाशी संबंध नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. तर भाजपतील पदाधिकाऱ्यांने बंडखोरी करीत शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले असताना भाजपकडूनही केवळ दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र युती असतानाही भाजपकडून केवळ २० टक्केच सहकार्य करण्यात आल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप किती दिवस चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.बंडखोरीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई नाही : एकनाथराव खडसेआपण तीस वर्षानंतर निवडणूक रिंगणात नाही. त्यामुळे आता शांत शांत वाटत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या पदाधिकाºयाने केलेल्या बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही. या मतदार संघात आम्ही विकासाची कामे केली आहेत. मतदार संघ भाजपचा आहे. त्यामुळे ३० ते ३५ हजाराच्या मताधिक्याने कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या निवडून येतील असा विश्वास आहे. बंडखोर उमेदवारावर कारवाई व्हावी, अशी आपण शिवसेना पक्ष प्रमुखांकडे मागणी केली होती. मात्र तसे झाले नाही. केवळ त्यांनी राजीनामा दिला असून त्यांचा पक्षाशी संबंध नाही असे उत्तर मिळाले. जाहीर अशी कारवाई मात्र शिवसेनेने केली नसल्याचे त्यांनी सांगितले.भाजपचे केवळ २० टक्केच सहकार्य मिळाले : गुलाबराव पाटीलविधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले शिवसेनेचे उमेदवार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या निवडणुकीत त्यांना भाजपचे केवळ २० टक्केच सहकार्य मिळाले. ८० टक्के मिळाले नाही, असा आरोप ‘लोकमत’शी बोलताना केला.पाळधी येथील जि.प. शाळेतील मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास मतदानासाठी बैलगाडीने आलेल्या गुलाबराव पाटील यांनी मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव हा मतदान असतो. त्यामुळे मतदानासाठी मी शेतकरी म्हणून बैलगाडीवर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळपासून सुमारे ७० गाव फिरून आलो. सगळीकडे उत्साह आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मी निश्चितपणे चौथ्यांदा निवडून येणार आहे. शिवसेनेची काय स्थिती राहील? अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्टÑाचे सांगता येणार नाही. मात्र मी स्वत: ५० हजाराच्या मताधिक्क्याने विजयी होईल. पाटील यांच्या विरोधातील भाजप व सेनेच्या बंडखोरांबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, बंडखोरीची खंडखोरी आता २४ रोजी दिसेल. आयुष्यात ते बंडखोरी करणार नाही. त्यांना स्वत:चे नाव माहिती नसेल म्हणून त्यांनी दुसºयाचे नाव व फोटो प्रचारासाठी वापरला असावा, अशी टीकाही त्यांनी केलीराज्यात युतीला २२० पेक्षा जास्त जागा : गिरीश महाजनराज्यात युतीची भक्कम स्थिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला २२० पेक्षा जास्त जागा मिळणार आहे. पक्षाने उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर सोपविली होती. याठिकाणी ४० जागा मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी मतदान केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केला.जलसंपदा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सकाळी येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये पत्नी साधना महाजन व त्यांच्या दोन्ही मुलींसह मतदान केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गिरीश महाजन म्हणाले की, पक्षाने माझ्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली होती. या विभागात युतीच्या उमेदवारांची स्थिती बळकट असल्याने ४० पेक्षा जास्त जागा निवडून येतील. जिल्ह्यातील सर्वच जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी यावेळी केला..
जळगाव जिल्ह्यात मतदानानंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:11 PM