चोपडा, जि.जळगाव : येत्या २५ सप्टेंबरपर्यंत पैसे देण्याची लेखी हमी दिल्यानंतर शेतकºयांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले. चोपडा साखर कारखान्याचे उसाचे थकीत पेमेंट मिळावे या मागणीसाठी शेतकरी कृती समितीतर्फे सोमवारी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन होणार होते.चहार्डी, येथील चोपडा सहकारी साखर कारखान्यास ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांना तोंडे पाहून उसाचे पैसे दिले गेले तर काही शेतकºयांना एक रुपयाही दिलेला नाही म्हणून ज्या शेतकºयांना पैसे मिळाले नाहीत त्यांना त्यांचे पैसे मिळावेत आणि ज्यांना दिले त्यांना कमी-जास्त प्रमाणात दिले गेल्याने अन्याय झाला म्हणून २७ रोजी सकाळी शेतकरी कृती समितीतर्फे शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी.पाटील, संजीव सोनवणे, अविनाश पाटील, सुभाष सपकाळ हे आत्मदहनासाठी तहसील कार्यालयावर आले होते.त्यावेळी एक तर लेखी हमी किंवा संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत, असा शेतकरी कृती समितीचा आग्रह होता.त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तहसीलदार दीपक गिरासे आणि पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी संबंधित शेतकºयांचे पैसे द्यावेत यासाठी ‘चोसाका’च्या संचालक मंडळास तहसील कार्यालयावर बोलाविले होते. त्यावेळी ‘चोसाका’तर्फे प्रतिनिधी म्हणून व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, संचालक प्रवीण गुजराथी आणि नीलेश पाटील हे आले होते. त्यानंतर चोसाकातर्फे आलेल्या प्रतिनिधींसमोर मुख्य प्रवर्तक एस.बी.पाटील यांनी आम्हा शेतकºयांना पैसे कधी मिळतील व ज्या शेतकºयांना कमी व जास्त पैसे दिले आहेत ते कोणत्या आधारावर दिले, अशी मागणी केली. त्यावर तहसीलदार दीपक गिरासे यांनी चोसाकातर्फे उपस्थित प्रतिनिधींना जबाब देण्यास सांगितले. त्यावर प्रवीण गुजराथी आणि नीलेश पाटील या दोन संचालकांनी सांगितले की, चेअरमन अतुल ठाकरे आणि इतर संचालक मुंबई येथे फायनान्स कंपनीकडे गेले आहेत. तीन ते चार दिवसात चोसाकाच्या मालमत्तेवर बोझा बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती झाली की फायनान्स कंपनीधारक पैसे देणार आहेत. त्यानंतर शेतकºयांना पैसे दिले जातील, असे सांगितले. मात्र हे शेतकºयांना लेखी स्वरूपात पाहिजे होते. म्हणून चर्चा सुरू असताना संचालक प्रवीण गुजराथी आणि नीलेश पाटील हे चेअरमन अतुल ठाकरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्यास तहसीलदारांच्या दालनातून बाहेर आले होते. अखेर सायंकाळी पाच वाजता पुन्हा चर्चा सुरू झाली. अखेर संचालक प्रवीण गुजराथी यांनी प्रभारी कार्यकारी संचालकांच्या स्वाक्षरीचे २५ सप्टेंबरपर्यंत पैसे देण्याचे लेखी पत्र मिळाले. त्यानंतर आत्मदहन आंदोलन थांबले. या वेळी शेतकºयांंमध्ये प्रदीप पाटील, चोसाका व पंचायत समिती सदस्य रामसिंग अमरसिंग पवार यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. चर्चा सुरू असताना कठोरा येथील शेतकरी एम.डी.पाटील, गणपूर येथील गोपाल संतोष पाटील यांनी तहसीलदारांसमोर आमचे पैसे अजून मिळाले नाहीत व जे मिळाले ते अतिशय कमी मिळाले म्हणून कोणत्या निकषावर चोसाका प्रशासनाने व चेअरमन संचालक मंडळाने पैसे दिले ते सांगावे. गोपाल पाटील यांचे चोसाकाकडे दोन लाख २३ हजारांपैकी केवळ १४ हजार रुपये मिळाले, ते कोणत्या आधारावर दिले ते प्रथम सांगावे. चारही पुढारी एकत्र आहेत अन् फक्त एस.बी.पाटील सर्वांचे विरोधक बनले आहेत.घाडवेलचे शेतकरी नरहर राजाराम पाटील यांनी, लाखो रुपये चोसाकाकडे घेणे असून, केवळ १२ हजार रुपये मिळाले असल्याचे सांगून कोणत्या आधारावर हे पैसे दिले आहेत त्याचा खुलासा करण्याची मागणी केली. सायंकाळी पुन्हा तहसीलदारांच्या दालनात बैठक झाली. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले.
लेखी हमी नंतर आत्मदहन आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 8:43 PM