लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आंतरशालेय महापालिकास्तरीय क्रीडा स्पर्धांची बिले देण्यात यंदा महापालिकेने तब्बल दीड वर्ष घेतले आहे. मनपा प्रशासनाने दीड वर्षांनंतर आता बिले देण्यास सुरूवात केली आहे. क्रीडा संघटकांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने ही बिले दिली जात आहे.
आंतरशालेय क्रीडा स्पर्धा या तालुकास्तर, जिल्हास्तर, महापालिकास्तरावर घेतल्या जातात. त्यातील जिल्हास्तरीय स्पर्धा या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात येतात तर महापालिकास्तरीय क्रीडा स्पर्धेची जबाबदारी महापालिकेकडे असते. मात्र मनपाचे अधिकारी गेल्या काही वर्षांपासून ही जबाबदारी टाळत आहेत. बहुतांश स्पर्धांने क्रीडा अधिकारी फक्त पारितोषिक वितरणासाठीच येतात. ज्या खेळांचे संघटक ही स्पर्धा घेतात. त्यांना आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी पंचांचे मानधन, आणि इतर साहित्याचा खर्च द्यावा लागतो. संघटक किंवा संघटना त्यासाठीची बिले मनपाकडे सादर करतात. मात्र मनपाचे अधिकारी बिलेच वेळवर अदा करत नसल्याचे चित्र आहे. दर वर्षी सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत ही बिले मनपाकडून दिली जातात. मात्र यंदा २०२१ उजाडला तरी ऑक्टोबर २०१९ मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांची बिले दिली गेलेली नाहीत. त्यामुळे क्रीडा संघटक देखील वैतागले आहे.
अखेर मनपाच्या क्रीडा विभागाला जानेवारीच्या अखेरीस बिले अदा करण्यास जाग आली. त्यानंतर ही बिले पुन्हा तपासण्यात आली आणि मग ती अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ज्यांनी बिले दिली त्यांना तरी पैसे द्या
बहुतांश क्रीडा संघटना या स्पर्धा घेतात. मात्र त्यासाठी लागलेल्या खर्चाचे बिल सादर करत नाही. महापालिकेच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे बहुतेक जण स्वखर्चानेच या स्पर्धा घेतात. मात्र ज्या संघटना ही बिले वेळेवर सादर करतात. त्यांना तरी मनपाने वेळेवर बिले अदा करावी, अशी मागणी क्रीडा संघटकांमधुन होत आहे.