जळगाव : शुक्रवारनंतर चांदीच्या भावात सोमवार, २८ डिसेंबर रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वाढून ५१ हजार २०० रुपये प्रति तोळा झाले.गेल्या आठवड्यात सोमवारी चांदीच्या भावात वाढ होऊन ती ७१ हजारावर गेली होती. त्यानंतर मात्र मंगळवारी ५०० रुपये व बुधवारी दोन हजार ५०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६८ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. शनिवारी हेच भाव कायम राहिल्यानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीत एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली व ती पुन्हा ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात सोमवार, २८ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार २०० रुपये प्रति तोळा झाले. बुधवार, २३ डिसेंबर रोजी सोन्यात ३०० रुपयांनी घसरण होऊन ५० हजार ७०० रुपयांवर आले होते. मात्र शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ९०० रुपयांवर पोहचले होते. आता पुन्हा त्यात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.सट्टेबाजारातील खरेदी-विक्रीच्या कमी-अधिक प्रमाणामुळे सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे.
पुन्हा ७० हजारावर : सोनेही ३०० रुपयांनी वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 8:49 PM