जळगाव : राज्यात डॉक्टर, रुग्णालय यांच्यावर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून संवादाअभावी अशा घटनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा संवाद वाढून हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये एजन्सी नियुक्त करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव येथे आयोजित होमिओपॅथी डॉक्टरांच्या मेळाव्यात ते म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र पारदर्शक करण्यात आले असून कोणीही त्यावर शंका घेऊ शकत नाही. धुळे व राज्यातील इतर ठिकाणच्या हल्ल्याच्या घटना दुदैवी असून या घटना वाढण्याचे कारण म्हणजे संवादाचा अभाव आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद ठेवल्यास गैरसमज कमी होतील. रुग्णालयांमध्ये जास्त गर्दी असलेल्या डॉक्टरांवर मोठा ताण असतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनीही समजून घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
रुग्णालयांवरील हल्ले रोखण्यासाठी एजन्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 4:12 AM