विवेक चांदूरकर, जळगाव : विविध मागण्यांसाठी पिंपळगांव काळे येथील गावकरी, शेतकरी, शेतमजूरांनी गुराढोरांसह आंदोलन करीत आमरण उपोषणाला २५ जानेवारी रोजी सुरूवात केली.
अनेकदा मागण्या करून वरिष्ठ अधिकार्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पिंपळगाव काळे येथील गावकर्यांनी विविध मागण्यांसाठी गुराढोरांसह आंदोलन करीत उपोषणाला सुरूवात केली आहे. अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेच्या पीक नुकसानाची मदत द्या, २२ जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे पिकांच्या नुकसानीचा सरसकट पिकविमा देण्यात यावा, येलो मोझँक रोगामुळे झालेल्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीची भरीव मदत द्या, पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या लँड सेटिंगची व अन्य समस्या तत्काळ सोडवा, तसेच पंतप्रधान किसान योजने संदर्भात शेतकऱ्यांना पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा, महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या विहिरी दुरुस्त करा, नवीन विहिरी बांधण्यासाठी अर्ज मंजूर करा, पिंपळगांव काळे येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करून द्या, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याचे कर्ज तत्काळ माफ करा, दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळांना आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांच्या कृषि पंपाना रात्री वीज पुरवठा न करता दिवसा आठ तास वीज उपलब्ध करून घ्या, या मागण्यांनसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात गावकरी, शेतकरी, शेतमजूर सामील झाले आहेत.
उपोषण मंडपात सारथी फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश भिसे, अनिल भोपळे, रामेश्वर काळे, सुधाकर घटे, रमेश बैरागी, गजानन चोखंडे, बबलू रायने, पंकज शेट्टे, मयूर शेट्टे, सुपडा चोखंडे, सुपडा मानकर, हरिदास वाघमारे, निलेश जवरे, गोपाल भोपळे, रमेश ढोले, शुभम पाटील, फिरोज खान, प्रमोद भोपळे, दिलीप मनसुटे, जनार्दन मांडोकार आदी गावकर्यांचा सहभाग आहे.