लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इंधन, गॅस सिलिंडर, खाद्यतेल, कृषी बी-बियाणे, कीटकनाशके, औषधी यांच्या दरवाढीविरोधात तसेच शाळा, अंगणवाड्या सुरू करीत बचत गटांना काम देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दुपारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मागण्या मान्य करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यासोबतच कोविड काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने त्यांना पुन्हा आरोग्य सेवेत काम देण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाने आठवड्याची सुरुवात झाली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन, गॅस सिलिंडर, खाद्यतेल, कृषी बी-बियाणे, कीटकनाशके, औषधी यांची दरवाढ मागे घेण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शांताराम पाटील, गोरख वानखेडे, वासुदेव कोळी, यमुनाबाई धनगर, प्रमिलाबाई धनगर आदी सहभागी झाले होते. विविध १३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अंगणवाड्या सुरु करा
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून आता शाळा, अंगणवाड्या सुरू करून मुलांना पोषण आहार देण्यात यावा तसेच बचत गटांनाही काम मिळावे, या मागणीचेही यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय द्या
कोरोना काळात कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी पद्धतीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता त्यांना तिसऱ्या लाटेचा विचार करता प्रशिक्षणासाठी वर्ग करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली असून या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर तसेच रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आता २ जुलैपासून या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आमच्यावर हा अन्याय असून हाताला काम देत हा अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने कार्यमुक्त न करता कर्मचाऱ्यांना उपचारांसाठीच्या प्रशिक्षणासाठी वर्ग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर प्रशांत तायडे, अक्षय तायडे, गोपाळ इंगळे, शब्बीर खान, गंगू बारेला, सविता बारेला, दिव्या सोनार आदींच्या सह्या आहेत.
‘ऑफ्रोह’ संघटनेचे साखळी उपोषण
सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतन व इतर आर्थिक लाभ नियमित देण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारपासून ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) संघटनेतर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ यावेळेत हे उपोषण करण्यात आले. नियमित निवृत्तिवेतन, अनुकंपा भरती, विविध प्रवर्गातील भरती यासह विविध मागण्या करण्यात आल्या असून या विषयी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर, सचिव सुरेश नन्नवरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे आंदोलन
पिवळे रेशन कार्ड धारकांच्या शिधापत्रिकेवर अंत्योदय योजनेचा शिक्का मिळावा, संजय गांधी निराधार योजनेसाठी हयातीचा दाखला दरवर्षी मिळावा, उत्पन्न दाखला रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अशोक बाविस्कर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.