लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील भादली ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथीयाने वॉर्ड क्रमांक चार मधून अर्ज भरला होता. मात्र हा वॉर्ड महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे अंजली पाटील उर्फ जान अंजली गुरू संजना (वय ४०) या तृतीयपंथीयाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील या देखील उपस्थित होत्या. त्यांनी तहसिलदारांच्या कार्यालयासमोर काही वेळ धरणे आंदोलन देखील केले. याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी वाल्हे यांनी त्यांना लेखी उत्तर दिले. मात्र त्याने समाधान होत नसल्याने अंजली यांनी हे पत्र स्विकारले नाही. तर शुक्रवारी या प्रकरणाबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
अंजली या तृतीयपंथीयाने २०१५ च्या ग्राम पंचायत निवडणुकीत देखील लढवली होती. त्यावेळी आपण ११ मतांनी पराभूत झाल्याचा दावा अंजलीने केला आहे. मात्र यंदा हा अर्ज हा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. भादलीतील वॉर्ड क्रमांक चार महिला सर्व साधारण प्रवर्गात राखीव आहे. त्यामुळे या वॉर्डातून मतदार यादीत ‘इतर’ असा उल्लेख केलेले निवडणुक लढु शकत नाही. त्यामुळे हा अर्ज बाद केल्याचे स्पष्टीकरण निवडणुक निर्णय अधिकारी वाल्हे यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र त्यावर अंजली आणि शमिभा पाटील यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर तेथे बराच वेळ वाद सुरू होता. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुरेश भोळे आणि तहसिलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा देखील केली.
कोट
निवडणुक आयोगाच्या २०११ च्या परिपत्रकात नमुद केल्या प्रमाणे तृतीय पंथीयांच्या बाबतीत मतदार यादीत त्यांच्या नावापुढे जे लिंग लिहले असेल त्याच प्रमाणे त्यांना निवडणुक लढवायची आहे. मात्र आता मतदार यादीत त्यांच्या नावापुढे इतर असे लिहले आहे. -नामदेव पाटील, तहसीलदार
---
२०१५ च्या निवडणुकीत आपण लढलो होतो. फक्त ११ मतांनी पराभव झाला. मात्र आताच निवडणुक लढवण्यात का नकार दिला जात आहे. यामागे नेमके कारण काय - अंजली, तृतीयपंथी
---
निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण न पटण्यासारखे होते. त्यामुळे त्यांनी दिलेले लेखी स्विकारले नाही. त्यामुळे आता उद्या जळगाव न्यायालयात यावर अपील करणार आहोत. - शमिभा पाटील, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी