मनपा लक्ष देईना, गाळेधारकही मागे हटेना : आज किडनी विक्री आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी गेल्या आठ दिवसांपासून पुकारलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी मंगळवारी गाळेधारकांनी भजी तळून व ती विक्री करण्याचे आंदोलन केले. तसेच महापालिका ज्या अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांना लाखोंची बिले देत आहे. त्या मार्केटमधील गाळेधारक भजी विक्री करून पोट भरणारे असल्याचे दाखवत, मनपा प्रशासनाचे या आंदोलनाव्दारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर झालेल्या या आंदोलनात डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, पंकज मोमाया, रिजवान जागीरदार, आशीष सपकाळे, सुरेश पाटील, विलास सांगोरे, रमेश तलरेजा, प्रकाश गागनानी, सुभाष तलरेजा, प्रशांत पगारीया, जगदीश दासवाणी, सुरज हेमनानी, संदीप वालेचा, अनुप अडरेजा, रमेश माधवाणी, सुनील रोकडे या गाळेधारकांनी सहभाग घेतला. गेल्या आठ दिवसांपासून गाळेधारकांनी साखळी उपोषण पुकारले असून, मनपा प्रशासन या आंदोलनाकडे लक्ष द्यायला तयार नाही. तर गाळेधारक देखील दुसरीकडे आक्रमक झाले असून, जोपर्यंत ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन व साखळी उपोषण सुरुच राहिल असा इशारा गाळेधारकांनी दिला आहे.
मनपाने गाळेधारकांना संपविण्याची सुपारी घेतली
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात मनपा प्रशासनावर आरोप करण्यात आले असून, मनपाने गाळेधारकांना संपविण्यासाठी सुपारी घेतली असल्याचे म्हटले आहे. ज्या गाळेधारकांच्या जीवावर शहरातील मोठी संकूले उभी राहिली त्याच गाळेधारकांना संपविण्यासाठीचा पुढाकार मनपाने घेतला असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. याचे उत्तर मनपा प्रशासनाला दिले जाईल असा इशारा गाळेधारकांनी दिला आहे. दरम्यान, बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळेधारकांकडून उपोषणस्थळी किडनी विक्री आंदोलन करण्यात येणार आहे.