जळगाव : रिअॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने केमिकल्स निर्मिती करणाऱ्या एमआयडीसीतील रवी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट होऊन अचानक आग लागली. यात सुदैवाने काम करणारे कामगार बालंबाल बचावले असून या स्फोटामुळे दोन कंपन्या आगीत खाक झाल्या आहेत. या घटनेत जीवत हानी झालेली नसली तरी कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील जी सेक्टर ४५ मध्ये रवींद्र पाटील यांच्या मालकीची रवी इंडस्ट्रीज ही केमिकल्स निर्मिती करणारी कंपनी आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता कंपनीत रिअॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने अचानक स्फोट झाला. त्यामुळे कंपनीतील केमिकल्स निर्मितीच्या एका पाठोपाठ सहा स्फोट झाले. त्यात तीन टाक्या फुटून आगीच काही मिनिटात भीषण आगीत रुपांतर झाले. काही वेळातच रवी इंडस्ट्रीज या कंपनीसह तिच्या बाजूची अविजिता इंटरप्रायझेस ही प्लास्टिकचे पीव्हीसी पाईप बनविणारी कंपनीच्या आगीत सापडली.आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्नजैन कंपनी, महापालिका तसेच मेरीको या कंपनीतील अग्निशमन बंब तसेच १५० फोमच्या कॅन मागविण्यात आल्या होत्या. सर्व जवानांनी जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संभाव्य धोका लक्षात घेता कंपनीच्याजवळपास कोणालाही जावू दिले जात नव्हते. दरम्यान, या घटनेत नेमके किती नुकसान झाले, कोणाला इजा झाली का? याबाबत अधिकृत बोलायला कोणीही तयार नव्हते.गीतांजली कंपनीच्या आठवणी ताज्यागेल्या वर्षी एमआयडीसीत गितांजली केमिकल्स या कंपनीतही रिअॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने स्फोट होऊन सहा ते सात कामगार भाजून मृत्यूमुखी पडले होते. या कंपनीत अगदी तसाच स्फोट झाला. कामगार किती होते व कोण होते याबाबत माहिती दिली जात नव्हती. या घटनेच्या निमित्ताने गितांजली केमिकल्स कंपनीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.विना परवानगी कंपनी सुरु असल्याचा आरोपजी सेक्टर ४५ मध्ये असलेल्या रवी इंडस्ट्रीज या कंपनीला परवानगी नाही. तरीही या कंपनीत केमिकलचे रिफायनरींग केले जात असल्याचा आरोप शेजारील कंपनी मालकांनी केला. त्यांनी कामगारांना सोबत घेऊन रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून विना परवानगी कंपनी सुरु असल्याची माहिती दिली. या कंपनीतील तीन हजार लिटरची टाकी फुटली तर संपूर्ण जी सेक्टर खाक होईल, अशी ही भिती येथील उपस्थित कामगारांकडून व्यक्त केली जात होती.तीनशे मीटरपर्यंत गटारीत आगया स्फोटामुळे रस्त्यावरील गटारीतून केमिकल्स वाहू लागल्याने त्यासोबतच आगही होती.तब्बल तीनशे मीटरपर्यंत नालीतून आग वाहत होती. या स्फोटामुळे परिसरातील कंपनीतील कामगार पळत सुटले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शहर व परिसरातील कंपन्या व मनपाचे अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. चार तासानंतर आग आटोक्यात आली.
केमिकल्स कंपनीत अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:40 AM