गेल्या वर्षी भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे जळगावला वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले तर गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रही मंजूर झाले. त्यामुळे जळगाव विमानतळाचे नाव आता जगाच्या नकाशावर आले आहे. दरम्यान, हे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाल्यानंतर, हे केंद्र सुरू करण्याबाबत २५ जून रोजी `जेट सर्व्ह एविएशन प्रायव्हेट लिमिटेड`च्या प्रतिनिधींनी जळगाव विमानतळाची पाहणी करून करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तर २८ जून रोजी `स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड` या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींनी जळगाव विमानतळाची पाहणी करून, प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत जळगाव विमानतळाचे संचालक सुनील मुगरीवार यांच्यासोबत करारनामा करार केला. यावेळी `स्कायनेक्स`चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अंकित भारद्वाज व कंपनीचे इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या कराराबाबत सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पडल्यानंतर, विमानतळाचे संचालक सुनील मुगरीवार व `स्कायनेक्स`च्या प्रतिनिधींनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या.