लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात येत असतानाही गरजू, गरीब मजुरांना अद्यापही अनुदान मिळाले नसून या दीड लाख अनुदान तातडीने मिळावे, यासह विविध मागण्यासांठी शेतमजूर युनियअनतर्फे (लाल बावटा)जि.प.वर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. विविध ठिकाणचे ५० लाभार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.
बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून हा मोर्चा काढण्यात आला. यात असोदा, ममुराबाद, विटनेर, बांबरूड राणीचे, आमखेडा, म्हसावद आदी गावांमधील पाच ते दहा लाभार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. सर्व गरीब मजुरांना निवासी प्रयोजनांसाठी ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करा, घरकूल बांधकामासाठी दीड लाख रु. अनुदान द्या, महाआवास अभियान यशस्वीरित्या राबवावे, शेतमजुरांना मनरेगा अंतर्गत कामे द्या, बेरोजगार भत्ता मिळावा, मनरेगा अंतर्गत अर्ज स्वीकारून पोचपावती देण्याचे ग्रामसेवकांना आदेश द्यावे, अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. दरम्यान, या मागण्या मान्य न झाल्यास जनतेच्या असंतोषास तोंड द्यावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. विनोद अढाळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉ. प्रकाश चौधरी, वसंत पाटील, विश्वनाथ मिस्तरी, रंजना कोळी, लोटन पाटील, गोकूळ कोळी, कल्पना खैरनार, जया कोळी, मंगला सोनवणे, सुरेखा कोळी, निजाम तडवी, गुलजार तडवी, प्रिया कोळी, भानुदास भिल, मनीषा कोळी, सुमन कोळी, शकुंतला खैरनार, गयाबाई बेलदार, सबजान ताडवी, शिवाजी सुतार, उषाबाई मिस्तरी आदींच्या निवदेनावर स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : ११ सीटीआर ०६