जळगाव : तालुक्यातील वडली येथे रासायनिक खताच्या वापरामुळे कापूस पिकावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेत उपस्थित झाला. जळगाव जिल्ह्यात वापरात आलेले खत तसेच बियाणे यांचा दर्जा तपासण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्यासंदर्भात कायदा करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी जाहिर केले.
कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर त्याचा पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत असल्याचा मुद्दा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीसह सभागृहात मांडला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात वडली येथे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. बियाणे व खते बनावट असल्याचे समोर येत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले. बनावट खते व बियाण्यांमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे मंत्री महाजन व पाटील यांनी सांगितले. बियाण्यांच्या संदर्भात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कायदा केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.