जळगाव : विविध कंपन्यांच्या विमानांना आकर्षित करून विमानतळाच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विमान इंधन करात १० वर्षांसाठी सूट देण्याचे घोषित करण्यात आले. सध्या लागणारा १३ टक्के कर थेट एक टक्क्यावर आणला असून यामुळे विमान कंपन्या जळगावात येण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या शहरांमध्ये विमानतळ आहे मात्र तेथे विमानांची ये-जा कमी आहे व त्या विमानतळांचा विकास झालेला नाही अशा राज्यातील १० विमानतळांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात इंधन करात सूट देण्यात आली आहे. सध्या विमान कंपन्यांना हा कर १३ टक्के द्यावा लागतो. त्यात आता १० वर्षांसाठी सूट देण्यात येऊन १२ टक्के कराची कपात करीत तो एक टक्क्यांवर आणला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सूटमुळे कंपन्या त्या-त्या शहरात जाण्यास तयार होतील व तेथील विमानतळाचा विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात जळगाव जिल्ह्याच्या शेजारील मराठवाडा, विदर्भासाठी उद्योग, सिंचन यासाठी वेगवेगळी तरतूद केली असताना जळगावला केवळ विमानतळाच्या विकासाच्या आश्वासनावर समाधान मानावे लागणार आहे.
विमानतळ विकास; इंधन करात सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 12:58 AM