जळगाव : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेमके किती आमदारांचे संख्याबळ आहे याचे कोडे अजूनही अनेकांना सुटलेले नाही. अशात पक्षाचे अजित पवार गटाचे प्रतोद आणि कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी ४४ पेक्षा अधिक आमदार आमच्याकडे आहेत. लवकरच राष्ट्रवादीचे सगळेच सोबत येतील, असा दावा केला आहे.
अनिल पाटील शुक्रवारी, जळगावात माध्यमांशी बोलत होते. अनिल पाटील म्हणाले, की पक्षाकडे आज ४४ पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. पुढे ४६, ४७, ४८ किंवा सगळेच राष्ट्रवादीचे येऊन जातील, अशी शंका आहे. राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून पक्षाला क्रमांक एकवर नेण्याचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याचा विकास करायचा आहे.
जळगाव दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, त्यांना राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखविण्यात अनिल पाटील आघाडीवर होते. यावरील प्रश्नावर ते म्हणाले, की त्यावेळचे पक्षाचे जे धोरण होते त्यानुसार केले. आता सत्तेत आहे. ग्राम पंचायत निवडणूक ते मंत्रिपद प्रवास केलेला आहे. दोन्ही मंत्र्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करू, असेही अनिल पाटील म्हणाले.