‘महायुती’सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी दिसली ‘बेदखल’! पाचोऱ्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 04:47 PM2023-09-13T16:47:13+5:302023-09-13T16:47:33+5:30
पाचोऱ्यात भाजप-शिंदे सेनेची ताकद, ‘घड्याळ’ मात्र दिसले बंद
कुंदन पाटील, जळगाव: भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘युती’त विकासाच्या नावाखाली ‘एन्ट्री’ करणाऱ्या अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला बेदखल ठरविण्यात आले आल्याचे चित्र मंगळवारी पाचोऱ्यात दिसून आले. शहरभर लागलेल्या फलकांवर भाजप-शिवसेना नेत्यांचाच बोलबाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र फारसे स्थान दिल्याचे दिसून आले नाही.
राज्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यासह समर्थकांनी शहरभर फलकबाजी केली. नेत्यांचे कटआऊटस्ही मोठ्या प्रमाणावर लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, अमीत शहा, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आर.ओ.पाटील यांच्यासह अनेकांचे कटआऊटस् झळकले. अजीत पवारांचे नाममात्र कटआऊटस् दिसले. सभेच्याठिकाणी भाजप-शिवसेनेचेच दुप्पटे दिसले. राष्ट्रवादीच्या चार-पाच महिलांनी ‘घड्याळ’चे दुपट्टे खांद्यावर घेत सभास्थळी हजेरी लावली. मात्र अजीत पवारांच्या राष्ट्रवादीला फारसे स्थान न दिसल्याने त्यांनीही खांद्यावरचे दुपट्टे गुंडाळून ठेवले.
अजित पवारही व्यस्तच
कार्यक्रमादरम्यान, अजीत पवारही निवेदनांसह विकास कामांच्या प्रस्ताव वाचण्यातच व्यस्त दिसले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी वारंवार चर्चा करताना दिसले. त्यामुळे अनेकांच्या भाषणाकडे त्यांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. स्वत:ही भाषण करताना अतिशय ‘कागदी’ बोलले. त्यामुळे सडेतोड बोलणारे अजीत पवार पाचोराकरांना मंगळवारी जरा वेगळ्याच ‘मूड’मध्ये दिसले.
घोषणेविना निरोप
एकनाथ शिंदे व अजीत पवार यांच्याकडून दुष्काळासह अन्यप्रश्नी काही घोषणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र दोघांनीही फक्त विकासाचा ‘पाढा’च वाचला. त्यामुळे अनेक जण कार्यक्रमात ‘डुलक्या’ घेताना दिसले. मुख्यमंत्रीही सोपस्कार आटोपण्यात व्यस्त दिसले. तेही फार उत्स्फूर्तपणे प्रतिसादही देत नव्हते. एकाच हाताने लाभ वाटप करीत त्यांनी लाभार्थ्यांचा निरोप घेत गेले. ही बाबही अनेकांना खटकत गेली.