सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपात गडबड; गुलाबराव पाटलांनी सांगितली आतली गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:00 AM2023-07-13T11:00:07+5:302023-07-13T11:01:38+5:30
मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही गुलाबराव पाटील यांनी मत मांडलं. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे.
- प्रशांत भदाणे
जळगाव- "सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे खाते वाटपात निश्चितच थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे खाते वाटपात थोडा विलंब होतोय", असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. अर्थ खात्याच्या बाबतीतही वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असंही ते म्हणालेत.
मंत्री गुलाबराव पाटील हे बुधवारी रात्री उशिरा नाशिक येथून जळगावात दाखल झाले. आज सकाळी ते पाळधी इथं त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. खाते वाटपावर कोणाचीही नाराजी नसेल. पण आता सर्व वावड्या उठवल्या जात असल्याचंही मत त्यांनी मांडलंय.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी मत मांडलं. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. मी पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच मुंबईत थांबलो होतो. परंतु नाशिक जिल्ह्यात घडलेल्या बसच्या अपघातामुळे मला नाईलाजाने तातडीने नाशिक इथे यावं लागलं. त्यानंतर मी नाशिक येथून घरी आलो. आज दुपारी किंवा उद्या सकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतोय, असंही ते म्हणाले. अजित पवारांना अर्थ खातं दिलं जाईल का, या संदर्भात मात्र त्यांनी बोलणं टाळलं. यासंदर्भात मला काहीही माहिती नसून तो वरिष्ठांचा विषय असल्याचं सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
उद्धव ठाकरेंना टोला -
राज्याच्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळायला हवं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कलंक असा शब्दप्रयोग केला होता. या विषयावर गुलाबरावांनी ही प्रतिक्रिया दिलीये. मला तर असं वाटतं की असे शब्द वापरण्यामध्ये काही अर्थ नाही. टीका टिप्पणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण कुणालाही काहीही बोलणं उचित नाही. मोठ्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळायला हवं. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोललं तर ठीक आहे, पण राज्याच्या नेत्यांनी अशा प्रकारे बोलायला सुरुवात केली तर खाली काय होईल हे त्यांना आवरण मुश्किल होईल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.