जळगाव : अक्षय तृतीया या सणावर कोरोनाचे सावट असून, माहेरवाशिणींचा झोका व जुगाऱ्यांचा पत्त्याचा डावही या कोरोनाने रोखलेला आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या निमित्त बाजारात असो वा गाव-खेड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अक्षय तृतीयेच्या उत्साहावर विरजण पडले असून, प्रथा व परंपरांवरदेखील खंड पडलेला दिसून येत आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याचा फटका सराफा आणि इतर व्यावसायिकांनादेखील बसला आहे. दरवर्षी या दिवशी सोने खरेदीतून मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा या व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
माहेवाशीण ही सासरीच, झोके खेळणेही बंद
अक्षय तृतीयेला ग्रामीण भागात अनेक प्रथा परंपरा आजही जोपासली जातात. अक्षय तृतीयानिमित्त अनेक माहेरवाशिणींना या आपल्या गावात येत असतात. तसेच आखाजीच्या विविध अहिराणी गाणी गात झोके घेण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहेरवाशिणी यंदाची आखाजी सासरवाडीतच साजरी करणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यासह गावांमध्ये आखाजीच्या दिवशी पत्त्यांचे फड रंगत असतात, मात्र, सोशल डिस्टंन्सिंग, मास्क वापरणे व गर्दी टाळणे अशा नियमांमुळे पत्त्यांचे फडदेखील यांना रंगणार नाहीत. पितरांचे स्मरण करण्याची परंपरा मात्र घरोघरी करता येणार आहे. या सणाला घागर भरून पितरांना नैवेद्य दाखविला जातो हीच प्रथा फक्त यंदा कायम राहणार आहे.