- कुंदन पाटीलजळगाव - राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक साडी वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात २४ लाख ८० हजार ३८० नग साड्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. शासनासाठी लाडाकोडाच्या ठरलेल्या महिला भगिनींना मोफत साड्या वाटपाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या साड्यांच्या रंगावरून वाद होतील, अशी भीती व्यक्त केली जात असून राज्यातील रेशन दुकानदार टेन्शनमध्ये आहेत.
प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबीयांसाठी पिवळे कार्ड वितरित केले जाते. साड्या मात्र अंत्योदय लाभार्थ्यांनाच मिळणार आहेत. त्यामुळे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीही साड्यांसाठी दावेदारी करतील. साड्यावाटपाची प्रक्रिया ई-पॉस मशिनद्वारे केली जाणार आहे. साहजिकच लाभार्थी उपस्थित राहतील, साड्यांच्या रंगांवरून स्वस्त धान्य दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने एकाच रंगाच्या साड्या उपलब्ध करून द्याव्यात.- डी. एन. पाटील (औरंगाबाद), अध्यक्ष, राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना
यंत्रमाग महामंडळावर वितरणाचे नियंत्रण- कॅप्टिव्ह मार्केट योजनेंतर्गत या १ साड्यांचे वाटप होणार आहे. त्यानुसार राज्य यंत्रमाग महामंडळाच्या प्रतिनिधींकडे जिल्हानिहाय वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे.- २४ मार्चपर्यंत वितरित करावयाच्या १०० साड्यांचा समावेश असलेल्या एका गाठीचे वजन ४१ ते ४६ किलो इतके आहे.- साड्या खराब होणार नाहीत, या दृष्टीने त्यांची हाताळणी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यामुळे पुरवठा विभागातील सर्वच यंत्रणा आता साड्यांच्या वितरणाचा धागा हाती घेऊन बसल्या आहेत.