लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रामभक्त हनुमानासह प्रभू रामचंद्रांचे गुणगान गाणारी अनेक सुमधुर गीते, हनुमानचालिसा पठण, रामनामासह रामभक्त हनुमानाचा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात मंगळवारी शहरातील मंदिरांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत आरती करण्यात येऊन साधेपणाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
जळगाव शहराला कोरानाचा विळखा घट्ट होत असताना विविध ठिकाणी सामाजिक अंतर पाळून व योग्य ती खबरदारी घेऊन भक्तांनी हनुमान जयंती घरच्या घरी साजरी केली. देवळात पुजाऱ्यांनी पूजा केली. लवकरात लवकर कोरोनामुक्तीबाबत हनुमानाला साकडे घालण्यात आले. पहाटे ५ वाजेपासून मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘जय जय जय, जय बजरंगबाली’च्या जयघोषात सर्वच मंदिरे दुमदुमली होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी बंद होती. त्यामुळे मंदिरांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
साधेपणाने जयंती उत्सव
गोलाणीतील दक्षिण मुखी हनुमान मंदिर, तपस्वी हनुमान मंदिर, पत्र्या हनुमान मंदिर, अन्नदाता हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, नवसाला पावणारा हनुमान मंदिर, पाताल हनुमान मंदिर, केशरीनंदन हनुमान मंदिर आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करीत अत्यंत साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली.
संगीतमय सुंदरकांड
हनुमान मंदिरांमध्ये सकाळी ६ वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संगीतमय सुंदरकांड, सत्यनारायण कथा, महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. सकाळी काही प्रमाणात मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांची किरकोळ गर्दी बघायला मिळाली. भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात होते. रथ चौकातील व पांडे चौकातील हनुमान मंदिरांवर सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.