जळगाव : श्री दत्त जयंतीनिमित्त शहरातील विविध श्री दत्तमंदिरांमध्येही आठवडाभरापासून पारायण व विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरातील दत्त मंदिरात दत्तनामाचा गजर सुरू आहे. वर्षभर येथील कर्मचाऱ्यांकडूनच दैनंदिन पूजा-आरती केली जात आहे. मंगळवारी पहाटे पूजा, आरती व काही ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे.
जळगाव एसटी स्टॅड
एसटी महामंडळाच्या जळगाव आगारात कार्यशाळेच्या समोर १९८०च्या सुमारास आगारातील कर्मचाऱ्यांनी श्री दत्ताचे मंदिर उभारले आहे. या मंदिरात दररोज सकाळी पूजा व आरती केली जाते. दत्तजयंतीला सर्व कर्मचारी वर्गणी जमा करून, सत्यनारायण, पूजा व आरतीचा कार्यक्रम करतात. त्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन केले जाते.
प्रातांधिकारी कार्यालय परिसर
प्रातांधिकारी कार्यालया समोरच श्री दत्ताचे छोटेसे मंदिर उभारून, मूर्तीची स्थापना केली आहे. कर्मचारी व या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या ठेकेदारांनी मंदिराची उभारणी केली असल्याचे सांगण्यात आले. २४ तास हे मंदिर उघडे असते. येथील कर्मचारीच मंदिरात दैनंदिन पूजा व आरती करत असल्याचे सांगण्यात आले.
पाटबंधारे विभागाचे कार्यालय
पाटबंधारे विभागाचे कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम झाल्यापासूनच या मंदिराची उभारणी झाली आहे. या मंदिराच्या शेजारीच हनुमानचेही मंदिर आहे. सकाळ-सायंकाळ येथील कर्मचारी व परिसरातील नागरिकांकडून नित्यनियमाने श्री दत्ताची पूजा व आरती करतात.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सुंदर असे दत्ताचे मंदिर बांधले आहे. येथील इमारतीचे लोकार्पण १४ एप्रिल १९८४ मध्ये झाले असून, त्याचवेळेस येथेही श्री दत्त महाराजांचे मंदिर बांधले असावे, अशी शक्यता कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे. याठिकाणी कर्मचारी मंदिरात पूजा, आरती करीत असल्याचे सांगण्यात आले.
जुने नगरपालिका रुग्णालय
फुले मार्केटजवळील जुन्या न.पा. रुग्णालयाच्या जागेवर आजही श्री दत्त महाराजांचे मंदिर आहे. रुग्णालयाची संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. मोकळ्या जागेतील दत्ताचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी सकाळी व सायंकाळी नेहमी गावातील एक पुजारी पूजा व आरतीसाठी येत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.