धानोरा,ता.चोपडा, दि.2- महाराष्ट्रदिनी झालेल्या महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करून तो मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कीर्ती किरण पाटील होत्या.
धानोरा गावात जवळपास पाच ते सात ठिकाणी अवैध दारू विक्री होते. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. गावात दारूबंदी करावी अशी महिलांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.
महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी इंदिरानगरातील छायाबाई विकास कोळी यांनी अवैध दारू विक्रेत्याकडून सात देशी दारूच्या बाटल्या जमा करून, त्या सभेत अध्यक्षांच्या टेबलावर ठेवल्या. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस शिपाई रवींद्र सोनार यांना अवैध दारू विक्रेत्यांची नावेही दिली. यानंतर सभेने दारूबंदीचा ठराव केला. दारूबंदीच्या ठरावासह सभेत पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
सभेला पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील, ग्रा.पं.सदस्या रेखा महाजन, अंजनाबाई साळुंखे, छबाबाई साळुंखे, निर्मलाबाई इंगळे, लक्ष्मीबाई कोळी, इंदूबाई कोळी यांच्यासह जवळपास 100 ते 150 महिला उपस्थित होत्या.(वार्ताहर)